शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : राष्ट्रीय समाज पक्ष बागलाण विधानसभा जागा लढविणार असून सर्व समाजाला बरोबर घेऊन जो उपेक्षित आहे त्याला अपेक्षित ठिकाणी ठेवण्यासाठीच पक्षाचे संस्थापक आदरणीय महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष निर्माण केला आहे. सर्व समाजाला न्याय देण्याची पक्षाची भूमिका असल्याने बागलाणची जागा लढविली जाईल. त्यामुळे पक्ष संघटन वाढवावे, सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. प्रल्हाद पाटील यांनी येथे केले.
बागलाण विधानसभा नियोजन बैठक राज्याचे प्रदेश सचिव, शेवगावचे भूमिपूत्र डॉ. प्रल्हाद पाटील यांचे उपस्थितीत नुकतीच नामपूर जिल्हा नाशिक येथे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य सय्यदबाबा शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, अ,नगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. पाटील म्हणाले, येथील स्थानिक अनेक मातब्बर नेते आमच्या संपर्कात असून या भागात राष्ट्रनायक महादेव जानकर यांचे अनुयायी तसेच पक्षाचा चाहता वर्ग मोठा असल्यानेआपले भवितव्य उज्वल आहे. त्यामुळे बागलणचा आगामी लोकप्रतिनिधी रासपचाच असेल अशी ग्वाही देवून लवकरच प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊ.
निरीक्षक सय्यद बाबा शेख म्हणाले, या तालुक्यातील उमेदवार विधानसभेत पाठवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपआपापल्या आघाडीचे प्रत्येक गावामध्ये किमान पाच पदाधिकारी तयार करावे. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष अण्णासाहेब गोयकर यांनी केले, तर आभार जितूभाऊ सूर्यवंशी यांनी मानले.