नांगरे यांची अंगावर चिखल घेऊन अभिषेक करत गांधीगीरी

बस स्थानक प्रशासनाचा केला निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शेवगाव बस स्थानकामध्ये साचलेल्या डबक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी चिखलाचा अभिषेक करून गांधीगीरी करत बस स्थानक प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

येथील बस स्थानकाचे बांधकाम गेल्या सहा-सात वर्षापासून संथ गतीने चालू आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे स्थानकामध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे हाल होत आहेत. स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, बस स्थानकाला असणाऱ्या बसेसची कमतरता, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, नादुरुस्त बसेस या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.

आज कॉ. संजय नांगरे यांनी शेवगाव बस स्थानकातील खड्ड्यामध्ये साचलेल्या चिखल मिश्रीत पाण्याच्या डबक्यात बसून चिखलाचा अभिषेक करून प्रशासनाचे लक्ष वेधले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी त्यांचेवर डबक्यातील पाणी टाकून अभिषेक घातला.