कर्तव्याचा विसर पडू देवू नका – आमदार काळे

रयत संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सुशीलमाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येवून आमदार काळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना आमदार काळे म्हणाले की, मागील ७५ वर्षात आपल्या देशाने प्रगतीचा अतिशय मोठा पल्ला गाठला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश विज्ञान, अवकाश संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, तंत्रज्ञान, सुरक्षा, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये जलद गतीने प्रगती करत असून ज्यांनी १९४७ ला आपल्या सोबतच सुरुवात केली ते मात्र, आपल्यापेक्षा अतिशय मागे पडले आहेत.

धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती अशा विविधतेने नटलेला आपला देश भारतीय संविधानामुळे व १३६ कोटी जनतेच्या देशप्रेमाच्या सामर्थ्यावर आजही एकसंघ आहे. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार बहाल केले असले तरी देशाचे नागरिक म्हणून आपली देखील काही कर्तव्य असून ही कर्तव्ये सर्वांनी पार पाडावी. सामाजिक सलोखा जपून आपल्यामुळे इतर कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या.

देशाची संपत्ती असलेल्या आपल्या बस, ट्रेन, शासकीय कार्यालये, रस्ते अशा अनेक संपत्तीचे नुकसान होणार नाही. याची दक्षता घेवून समाजातील गरजूंना आवश्यक असणारी मदत करावी ही देखील एक देशभक्तीच आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवून संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देवू नका असा बहुमोल संदेश आमदार काळे यांनी यावेळी दिला. कोपरगाव तहसील कार्यालय येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आमदार काळे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभाग व शाळेच्या एन.सी.सी. कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक अशोक मवाळ, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद तसेच कारखाना व उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, प्राचार्य सुभाष भारती, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य प्रकाश चौरे, प्राचार्या हेमलता गुंजाळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे तसेच शिवाजी वाबळे, कचरू कोळपे, सर्व शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.