शेवगाव वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ :  शेवगाव हे तालुक्याचे शहर असून सुमारे ६० हजारावर लोकसंख्या पोहचली आहे. मराठवाड्याचे प्रवेश द्वार असल्याने शहरातून सर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शहराला बाह्य वळण रस्ता नसल्याने येथे दररोज वाहतूक कोंडी होते. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असल्याने उस वाहतुक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर जुगाड, बैलगाड्याची त्यात भर पडते. वाहतूक कोंडी झाली नाही असा दिवस जात नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

त्यातच तालुक्याचे शहर असून येथे आठवडे बाजाराला पुरेसी जागा नसल्याने अर्धा अधिक बाजर रस्त्याच्या दोन्ही बाजूस व दुभाजकावर भरतो. अशा वेळी कोंडी झाली तर सर्वच रस्त्यावर मैल दीड मैल वाहनाच्या रांगा लागतात. रविवारी (दि.२८) लग्न तिथ दाट होती तशात शेवगावचा आठवडे बाजार देखील असल्याने वरचेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. कान्ती चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर किमान मैल दीड मैल वाहनाच्या दूतर्फा रांगा लागल्या होत्या.

वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत, त्यामुळे क्रान्ती चौकातून डॉ.आंबेडकर चोंकापर्यत जायलाच दोन अडीच तास लागत. त्यामुळे शहरातच असलेल्या दुसऱ्या लग्नाला प्रयत्न करूनही अनेकांना उपस्थिती लावता आली नाही. डॉ. आंबेडकर चौकात तर रस्त्याच्या एका बाजूने कोंबड्या व अंड्याचा बाजार भरतो तर दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते बसलेले असतात.

नेवासे रस्त्यावर तर रस्त्याच्या कडे सह मधल्या दुभाजकावर देखील भाजीपाला व फळाची दुकाने लागतात. या वर तोडगा काढण्यासाठी शेवगावाच्या बाह्य वळण रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागयला हवा. खा. डॉ. सुजय विखे यांनी यावर्षी या कामाचे सर्वेक्षण व भूसंपापदन प्रस्ताव तयार करुन  सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी ६० लाखाची तरतूद करवून घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात शेवगाव बाहयवळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.