गौतम पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ :  दिल्लीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये सालाबादप्रमाणे याहीवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा हजारो आजी माजी विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव चैताली काळे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, संस्थेचे विश्वस्त सिकंदर पटेल, बाबासाहेब कोते, प्राचार्य नूर शेख उपस्थित होते.  

यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, सध्या स्पर्धेचे युग असून शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. या स्पर्धेत कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी स्थापन केलेल्या गौतम पब्लिक स्कूल ने देखील संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुरूप बदल करून कला, क्रीडा, व गुणवत्ता अशा सर्वच क्षेत्रात आपली गुणवत्ता अव्वल ठेवल्यामुळे गौतम मध्ये आदर्श विद्यार्थी घडत असून त्यामुळे निश्चितपणे गौतम पब्लिक स्कूलचा वाढत असलेला नावलौकिक अभिमानास्पद आहे. ही गुणवत्ता कायम राखली जात असून यापुढे देखील अबाधित राहणार आहे. त्यामुळे परीक्षा संपताच प्रवेश सुरु होतात हि गौतम पब्लिक स्कूलने खासियत जपली असल्याचे सांगितले.

वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा सुरु होवून सर्वप्रथम कॉक हाऊस विजेता ऑरेंज हाऊसला आ. आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या हस्ते कॉक हाऊस ट्रॉफी प्रदान करण्यात येवून वार्षिक स्नेहसंमेलनास प्रारंभ करण्यात आला. गौतमच्या विदयार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार, नाटीका यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पाहुण्यांचा परिचय अशोक होन यांनी करून दिला तर वार्षिक अहवाल वाचन ज्योती शेलार यांनी केले.

कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण व सांस्कृतिक विभाग प्रमुख रेखा जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार राजेंद्र आढाव यांनी मानले. यावेळी गौतम पब्लिक स्कूलच्या बाल वैज्ञानिकांनी तयार केलेल्या विविध उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात पालकांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान द्वितीय सत्रातील पालक भेटी निमित्त मोठ्या संख्येने शाळेत दाखल झालेल्या पालकांनी या गणित, विज्ञान व कला प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचे कौतुक केले.