कोपरगाव बस आगारात होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देवून या बस चार्जिंग स्टेशनच्या ०२ कोटी ६४ लक्ष ३५ हजार निधीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यावर धावणाऱ्या अनेक बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस असणार आहेत. इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होण्यासोबतच सातत्याने वाढत असलेले प्रदूषण कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे.

त्यामुळे एकीकडे आर्थिक बचत व दुसरीकडे पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टी साध्य होणार असल्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे या बसेसचे चार्जिंग स्टेशन कोपरगाव बस आगारात व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मंजूरी देवून या कामाची २.६४ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

लवकरच या कामास प्रारंभ होणार असून इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम पूर्ण होताच कोपरगाव आगारात देखील इलेक्ट्रिक बस दाखल होतील. त्यामुळे प्रवाशांना किफायतशीर दरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होवून सुखकर प्रवास सेवा मिळणार आहे. आ.आशुतोष काळे यांच्या मागणीची दखल घेवून बसस्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी महायुती शासनाने निधी मंजूर केला आहे.

तसेच इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी मंजूरी देवून निधी दिला त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.