पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे कोल्हे यांच्याकडून अभिनंदन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने फेडरेशनच्या कार्यालयासाठी स्वत:च्या मालकीची जागा व त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करावे. पतसंस्था फेडरेशनच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही बिपीन कोल्हे यांनी दिली.  

कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाची सन २०२४-२०२९ या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी पाच जागा बिनविरोध निघाल्या होत्या. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून संतोष सोमनाथ गायकवाड, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून हेमंत विठ्ठल गिरमे, महिला राखीव मतदारसंघातून लता बाळासाहेब बनकर, चित्रा गंगाधर वडनेरे, भटक्या/विमुक्त जाती-जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून राजेंद्र निवृत्ती कोळपे हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

सर्वसाधारण मतदारसंघातील सहा जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी (२८ जानेवारी २०२४) मतदान झाले. त्यात ज्ञानदेव दगू मांजरे हे ३४ मते, रंगनाथ सखाराम लोंढे हे ३२ मते, दादासाहेब रामचंद्र औताडे हे ३१ मते, गुलाब बाजीराव वरकड हे ३० मते, राजेंद्र मधुकर देशमुख हे २७ तर आशुतोष विनायक पटवर्धन हे २९ मते मिळवून विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा वाळके यांनी काम पाहिले.

कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून बिपीन कोल्हे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी सहकारी पतसंस्था, बँका व इतर सहकारी संस्थांना नेहमीच पाठबळ देऊन सहकार वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही सहकारी संस्थांना पाठबळ देत त्यांच्या प्रगतीसाठी काम करीत आहोत.

सहकारी चळवळीला मोठा इतिहास असून, गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून सहकार चळवळ देशाच्या विकासात योगदान देत आहे. सहकार क्षेत्राच्या चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला असून, राज्याच्या विकासात सहकारी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था अशा विविध ५६ प्रकारच्या संस्थांचे मोलाचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सहकार क्षेत्रात अनेक बदल होत आहेत.

त्यांनी सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने यांच्या हितासाठी पोषक धोरणे आखली असून, त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. पतसंस्था या सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करतात. केंद्र व राज्य सरकारचे सहकारी पतसंस्थांना भक्कम पाठबळ असून, पतसंस्थांनी सध्याच्या स्पर्धेच्या काळात अचूक आर्थिक व्यवहार, डिजिटायझेशन, पारदर्शकता व सुयोग्य कारभार करून ठेवीदारांचा विश्वास संपादन करावा.

तसेच भवितव्याच्या दृष्टीने सर्वच सहकारी पतसंस्थांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. सर्व सहकारी पतसंस्थांचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून प्रशिक्षित होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.