कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : समाजाच्या उध्दारासाठी संत अवतार घेत असतात प्रत्येकाच्या जीवनांत साधु संत महंत यांची संगत असेल तर नक्कीच फळ मिळते, असे प्रतिपादन दत्त देवस्थान देवगडचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलीन, संत रामदासीबाबा यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळ्याची सांगता रविवारी काल्याच्या किर्तनाने झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
विश्वात्मक जंगलीदास माऊली देवस्थानचे प.पू. परमानंद महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, मनुष्याच्या जीवनांत ध्यानधारणा, महत्वाची आहे. प्रत्येकाने जीवनात प्राप्त केलेल्या धनातील काही अंश देवकार्याला देऊन ते शुद्ध करावे. जगात तत्त्वदर्शी महात्मे कुठे भेटत नाही पण कोकमठाणच्या नगरीत अनेक साधू संत महंतांचे वास्तव्य असल्याने पुण्यकर्माचा संचय येथे ओतप्रोत भरलेला आहे. ब्रम्हज्ञान आणि भोजन अशा दोन पंक्तीचा लाभ रामदासी बाबा भक्त मंडळाच्या सर्व भाविकांना मिळाला आहे. गोदाकाठी शेकडो महतांनी अवतारी कार्य केलेले आहे.
समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी म्हणाले की, प्रत्येकाच्या अंतकरणातील कालवा-कालव थांबविण्यासाठी आजचा हा काला येथे घडत आहे. गोदाकाठी तपसाधना करून समर्थ रामदासस्वामी कृष्णेकाठी सज्जनगडावर स्थिरावले आणि भिलवडी कृष्णाकाठचे रामदासीबाबा गोदाकाठी तपश्चर्या करून कोकमठाणवासिय झाले हा अनोखा भक्तीचा योगायोग आहे.
भारतभुमीत २२ जानेवारी रोजी श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्यामुळे प्रत्येकाची बॅटरी आता चार्ज झालेली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सज्जनगडावर साधु संत महंतांचे संमेलन भरविले होते म्हणून या गडाला सज्जनगड असे नाव पडले आहे अशी आठवण त्यांनी सांगितली.
महंत प्रकाशानंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, रामदासीबाबा आणि दत्तगड देवस्थानचे किसनगिरीबाबा यांचा पराकोटीचा संबंध ओह. प.पू भास्करगिरी महाराजांच्या कृपार्शिवादांने कोकमठाणच्या तीनरखणीत भगवंतांचे चरित्र काल्याचे किर्तन म्हणून सांगण्यांची प्रसाद्रूपी सेवा महंत भास्करगिरी महाराज यांच्यामुळे आपल्याला मिळाली. साधु-संत-महंत यांची संगत आदराने करा, संत अवतार घेत असतात. कोकमठाणपंचक्रोशीय वासियांना अखंड तीनखणीची ऊर्जा रामदासीबाबांच्या सचेतनेतून मिळत आहे, हा परमेश्वरी साक्षात्कार आहे.
याप्रसंगी विश्वात्मक जंगलीदास माऊली देवस्थानचे परमानंदगिरी महाराज, समर्थभक्त प्रसादबुवा महाराज, जुनापंचदशनाम आखाड्याचे ठाणाधिपती महंत भागवतानंदगिरी महाराज, राघवेश्वरानंद महाराज, मेजर महाराज, विवेकानंद महाराज, कृष्णानंद महाराज, पुर्तीनंद महाराज (युरोप) नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे संतोष महाराज दीक्षित, डॉ. शुभम कांडेकर महाराज, आदी संत महंतांचा रामदासीबाबा भक्त मंडळाच्यावतीने संत पूजन करण्यात आले. शेवटी मसालेभात व बुंदीचा महाप्रसाद भाविकांना देण्यांत आला.