पाच लाख ऐवजाला चोरट्यांनी लावले चंदन

शेवगाव प्रतिनिधी, दि.०४ : तालुक्यातील बोधेगाव जवळील शेवगाव गेवराई राजमार्गाजवळील मारुती वस्ती वरील शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी तर पत्नी बोधेगावात काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी गेल्या असता मागे भर दुपारी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे पाच लाखा वर ऐवज चोरून पोबारा केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा या संदर्भात चोरीची तक्रार दाखल करण्याचे काम चालू होते.

या चोरीची अधिक माहिती अशी की, मारुती वस्तीवर रामनाथ लक्ष्मण ढेसले व पत्नी जिजाई हे दोघे पतिपत्नी सध्या त्यांच्या ‘रामजिजाई’ बंगल्यात  राहतात. त्यांची दोन्ही मुले नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. शनिवारी रामनाथ ढेसले सकाळीच शेतात पाणी भरण्यासाठी तर पत्नी जिजाई बोधेगावी सुरु असलेल्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाला गेल्या होत्या. त्यांच्यावर पाळत ठेवून चोरट्यानी नेमक्या या सधीचा फायदा घेतला.

चोरट्याने भर दुपारी बंगल्या नजिकच्या शौचालयावर चढून घरासमोरील आंगणात उडी मारून लोखंडी कटावणीच्या साह्याने बंगल्यच्या दरवाज्याचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आतील बंद लोखंडी कपाटाचे लॉक तोडून उचकापाचक करून त्यातील सोन्याचा सर, सेव्हनपीस, झुंबर वेल, दोन आंगठ्या, पोथ, नथ, आदि सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व कापूस विक्रीचे आलेले एक लाख रु. रोख असा अंदाजे पाच लाखाचा ऐवज चोरट्याने भर दिवसा लुटून नेला आहे. 

बंगल्याच्या छतावर कोणी तरी असल्याचे रामनाथ यांचे मोठे बंधू अशोक ढेसले यांच्या मजुराने पाहिले. तो माहिती रामनाथ यांना फोनवर कळविल्यानंतर ते तातडीने घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांना कळविल्या वर तेही उशीरा आले. श्वान पथक आले त्याचाही उपयोग झाला नाही. रात्री उशीरा तक्रार दाखल करण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली हवालदार राजेंद्र ससाने तपास करत आहेत.