हज व उमराह यात्रेच्या भाविकांसाठी मार्गदर्शन शिबिर

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज व उमराह यात्रा ही दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियातील हज व उमरा ही यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंनी हजचे पावित्र्य कायम ठेवावे, यात्रेत ज्या पद्धतीचे आचरण ठेवण्यात येते तसेच आचरण यात्रा संपल्यावर संपूर्ण आयुष्यात ठेवावे. असे प्रतिपादन बोधेगाव येथील मदिना मज्जितचे मौलाना हाफीज अब्दुल मजीद यांनी केले.

या पवित्र यात्रेला जाणाऱ्या तालुक्यातील बोधेगाव येथील ७ पुरुष व ७ महिला यात्रेकरूसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून त्यांना ऑनलाइन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी हाफीज अब्दुल माजिद हे बोलत होते. हाफिज अब्दुल मजीद यांनी ‘हज व उमराह यात्रेची तयारी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतांना यात्रेत सतर्कता कशी ठेवावी, येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी कोणत्या, त्या कशा सोडवाव्यात यासंबंधीही मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच विमानतळावर यात्रेकरूंनी काय करावे याची संपूर्ण माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी या यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांचे यथोचित स्वागत व सन्मान करून सर्वानी अल्लाहकडे दुवा केली. येथील जेष्ठ नेते मुसाभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण, प्रा. नवाब पटेल, प्रा. शाहनवाज बागवान, इसाक शेख, हाजी अब्दूल रहीम, अल्फाज सर, राजू बागवान, सिकंदर भाई कुकानावाले, इम्रान भाई, रमजू बागवान, लतिफ पिंजारी यांच्यासह विविध भागातील समाजाचे धर्मगुरू, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.