ताजनापुर योजनेसाठी संपादीत जमीनींचे भु भाडे व्याजासह द्यावे, खंडपीठाचा आदेश

शेवगाव प्रतिनिधी, दि.१० :  जायकवाडी प्रकल्पग्रस्तांसाठी मंजूर करण्यात आलेला ताजनापूर उपसा सिंचन योजना हा प्रकल्प पाइप वितरण व्यवस्थेसह ठिबक सिंचनाचा प्रकल्प आहे, सदर प्रकल्पासाठी शेवगाव तालुक्यातील मौजे दहिफळ येथील शेतकऱ्यांच्या जमीनीचा ताबा घेण्यात आला होता. सन 1986 रोजी खाजगी वाटाघाटीतून जमिनीचा ताबा सदर योजनेसाठी घेण्यात आला व सन 2012 मध्ये सदर ताजनापुर उपसा सिंचन योजना प्रकल्प पूर्ण झाला.

भूसंपादनाचा अवार्ड जाहीर करण्यात आला.  या अवार्डनुसार शेतकऱ्यांना तटपुंजी रक्कम भू – भाडे म्हणून देण्यात आली, तसेच सण 1986 पासून 2016 पर्यंत कोणतेही भू – भाडे शेतकऱ्यांना देण्यात आले नव्हते, करिता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर, उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग, भूसंपादन अधिकारी शेवगाव यांच्याकडे भू- भाडे मागणी करिता वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

परंतु हे सर्व करत असताना शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडल्याने अखेर ॲड. शिवनाथ भागवत व निलेश भागवत यांच्या मार्फत उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे याचिका दाखल करण्यात आली, सदर याचिकेवर अंतिम सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. वी. घुगे व वाय. जी. खोब्रागडे यांच्या पिठाने उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग व कार्यकारी अभियंता शेवगाव यांना याचिका कर्त्यांना तीन महिन्यात भू – भाडे व्याजासह देण्याबाबत आदेश करण्यात आले.

गेले 37 वर्षापासून जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना या आदेशाने मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी याचिका कर्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने विधिज्ञ शिवनाथ भागवत व निलेश भागवत यांनी काम पाहिले तर शासनाच्या बाजूने सरकारी वकील यांनी काम पाहिले.