कोपरगावच्या बड्या नेत्याचा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० :  कोपरगाव तालुक्यातील उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे अनेक नव्या जुन्या शिवसैनिकांच्या विचारात भिन्नता आली. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्यानंतर गेल्या सात वर्षापासून तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी नितीन औताडे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.

नव्या-जुन्या शिवसैनिकाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी अनेक बैठका लावल्या. मात्र, कुणी कुणाला मागे सारून पुढे जातो की काय या संकुचित विचाराने गटबाजी सुरूच राहिली. यामुळे शिवसेना पक्षाचे प्रामाणिक काम करण्यात व्यत्यय येत असल्याचे लेखी पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत औताडे यांनी उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ग्रामीण भागासह शहरात शिवसेनेचा मोठा वर्ग आहे. मात्र, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा एकमेकात मेळ नसल्याने अनेक कार्यकर्ते पक्षातून निघून गेले. तर काही कार्यकर्ते पक्षवाढीसाठी काम करतात. मात्र, त्यांना काम करू दिले जात नाही ही बाब अत्यंत खेदाची आहे. याच पक्षाने कोपरगावमध्ये दोन वेळा शिवसेनेचे आमदार निवडून दिले तर नगराध्यक्षपद ही शिवसेनेकडे ठेवले होते.

वेळोवेळी पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भूमिका घेतली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही संघटनेच्या वतीने वरिष्ठ पातळीवर याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा स्वीकारण्या बाबत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझी आपण उत्तर विभाग अहमदनगर जिल्हा समन्वयक पदी निवड केलेली होती. सात वर्षा पासून पक्षाचे निष्ठेने काम करत असताना आपल्या संयमी व प्रेमळ स्वभावाचा मला जवळून अनुभव घेता आला.

संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे व माजी मंत्री शंकर गडाख यांचे पक्षात काम करताना मोलाचे सहकार्य मिळाले. त्यातील अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, काही संकुचित विचारांच्या कार्यकर्त्यामुळे मला ते शक्य झाले नाही. अशा संकुचित विचारांच्या कार्यकर्त्यांबरोबर काम करणे यापुढे शक्य नसल्याने मी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत आहे. आपण तो स्विकारावा असे नितीन औताडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रातून सांगितले आहे.