आपण आपल्या चुकांमधून शिकतो – विदिशा म्हसकर

शेवगाव प्रतिनिधी, दि.१० :-  आपल्याला कोणते क्षेत्र आवडते हे आपल्याला शालेय जीवनातच कळते म्हणून आपण आपल्यावर विविध प्रयोग करुन आपले क्षेत्र निवडायला हवे. अभ्यास करा, कलागुणांना वाव द्या, आपण आपल्या चुकांमधून शिकत असतो. जीवनात आत्मविश्वासाने विविध आव्हाने, संघर्षांना सामोरे जा आणि ध्येय प्राप्त करा असा संदेश अभिनेत्री विदिशा म्हसकर यांनी दिला.

येथील निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून म्हसकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त व जि.प.सदस्या हर्षदा काकडे होत्या. मंचावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ. संकल्प लोणकर, चिफ कोअर्डिनेटर प्रा.सुनील आढाव, प्राचार्य डॉ. शंकर वरखेडे उपस्थित होते.

काकडे म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील उच्च व अद्ययावत शिक्षण मिळावे व आपले हे विद्यार्थी विविध स्पर्धात्मक क्षेत्रात चमकावेत. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊन तालुक्याच्या विकासात भर पडेल. म्हणून निर्मल ब्राईट फ्युचर स्कुलची स्थापना संस्था अध्यक्ष अॅड. विद्याधर काकडे यांनी केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांप्रमाणेच आम्हांला आनंद होतो.

प्रमुख पाहुणे डॅा. नागरगोजे म्हणाले शेवगाव मध्ये १२ वर्षांपूर्वी सीबीएसई स्कुलची स्थापना करणे ही काकडे कुटुंबाची एक दिव्य व दुरदृष्टीच आहे. येथील विद्यार्थी कला, क्रीडा, स्पर्धा क्षेत्रात प्राविण्य मिळवून उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेत असल्याचे पाहून आनंद होत आहे.

क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोल्ड मेडल, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्य समन्वयक प्रा.सुनील आढाव यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली शेटे व संजीवनी वाघमारे तसेच राशी कुंदे व कृष्णकुमार धुत या विद्यार्थिनीनी केले. सागर गजभीव यांनी आभार मानले.