स्पर्धेतून पडतात व्यक्तिमत्वाचे पैलू – निवृत्त ग्रुप कॅप्टन पराग पटेल

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : प्रत्येक उपक्रम, स्पर्धा, इत्यादींमधिल सहभागाने संघ भावना, व्यवस्थापन कौशल्ये, एकमेकांना जाणुन घेण्याची हारजीत पचविण्याचे, असे कळत नकळत विविध व्यक्तिमत्वाच्या पैलुंची जडणघडण होत असते. म्हणुन प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी यश अपयशाची तमान बाळगता सहभाग घेवुन जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन इंडियन एअर फोर्सचे निवृत्त ग्रुप कॅप्टन पराग पटेल यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात पटेल प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. विविध क्षेत्रात पारंगत असलेले सुरेश कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी मंचावर दुसरे प्रमुख अतिथी म्हणुन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख होते.

यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, सचिव ए. डी. अंत्रे, डायरेक्टर (नाॅन अकॅडमिक) डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य दरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा, शिस्त, विविध स्पर्धा, इत्यादी क्षेत्रात विविध पातळीवर मिळविलेल्या नैपुण्याबध्दल गौरविण्यात आले.

पोलिस निरीक्षक देशमुख म्हणाले की, इतर शाळा आणि सैनिकी शाळा यात फरक असतो. सैनिकी शाळेत शिस्त, व्यायाम, सर्वांगीण विकासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी, अभ्यासाठीची विशिष्ट वेळ, सकस आहार, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, सैनिकी प्रशिक्षण, इत्यादी सर्व बाबींमुळे उत्तम नागरीक घडतो. तसेच शालेय जीवनापासुनच सैन्यात कोणती पदे व त्या पदांसाठी काय शिकायचे, याचे ज्ञान मिळते.

सुमित कोल्हे म्हणाले की, माजी मंत्री व संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे सैनिकी शाळेवर विशेष प्रेम होते. वयाच्या ९३ व्या वर्षीही त्यांची दिनचर्या सैनिकी स्कूलमधुनच सुरु होत असे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घालुन दिलेली मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सध्याही संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

यामुळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होण्यासाठी आपल्या जीवनात उत्तम कार्य करणाऱ्या  व्यक्तींना मार्गदर्शक म्हणुन येथे नेहमी आमंत्रित करण्यात येते. अध्यक्षस्थानवरून बोलताना सुरेश कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले की, सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे.

तुमच्या विविध उपलब्धींनुसार तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत आहात. यश प्राप्त करण्यासाठी सततची धडपड महत्वाची असते. त्यासाठी सैनिकी स्कूल मधुन होणारी जडणघडण महत्वाची असते. बक्षिस वितरण सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी शानदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर उपस्थितांची वाहवा मिळविली.