शिवाजी महाराजच्या पुतळ्याचे शिवजयंतीदिनी होणार लोकार्पण

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ :  पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती समोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे सोमवारी शिवजयंतीचे मुहुर्तावर लोकार्पण होणार आहे.

जुन्या पंचायत समितीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या अर्धकृती पुतळ्याचे स्थलांतर नवीन प्रशासकीय इमारतीसमोर करावे असे तालुक्यातील शिवप्रेमींची इच्छा होती. माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. त्यासाठी भरीव निधीची तरतूदही केली. सध्या हे काम प्रगतीपथावर असून येत्या १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्याचे स्थलांतर करून लोकार्पण करण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चार डिसेंबर २०२० साली पुतळा स्थलांतर करण्यास परवानगी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदअध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. नवीन जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या ठिकाणी उत्कृष्ट असे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींना आनंद झालेला आहे. तत्कालीन गट विकास अधिकारी महेश डोके तसेच विद्यमान गट विकास अधिकारी राजेश कदम सहाय्यक श्रीराम चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील या कामी जातीने लक्ष घालून योगदान दिले आहे.