मुलींच्या करिअर विकासासाठी समाजाचा पाठिंबा हवा – चैताली काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : आज वर्गा वर्गांतून मुलींची संख्या अधिक दिसत आहे. मुली सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. असे असूनही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही निर्भय कन्या अभियान सारखे कार्यक्रम राबविण्याची वेळ येते. याचे कारण मुलींना करिअर मार्गावर पुढे जाताना समाजाचा पाठिंबा मिळत नाही. मुलगी म्हणून तिला अनेक बंधने लादली जातात. समाजाचा पाठिंबा मिळाल्यास मुली नक्कीच निर्भया बनतील असे प्रतिपादन कॉलेज विकास समितीच्या चेअरमन मा. चैताली काळे यांनी केले.

येथील एस. एस. जी. एम. कॉलेजच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समिती अंतर्गत ‘निर्भय कन्या अभियान कार्यक्रम’ नुकताच संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून चैताली काळे बोलत होत्या. स्त्रियांना बायोलॉजिकल आणि करिअर या दोन घड्याळांच्या मर्यादेत राहावं लागतं. बायोलॉजिकल दृष्ट्या आज अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. घटस्फोटाचे प्रमाणही वाढते आहे. यासाठी स्त्रियांना आहार व कायद्यांची माहिती आवश्यक आहे.

माहितीतून ज्ञान व ज्ञानातून आत्मविश्वास प्राप्त होतो. आत्मविश्वासातून अभिमान निर्माण होऊन स्त्री निर्भय बनते. त्यासाठी स्त्रियांनी आत्मविश्वास प्राप्त करावा असेही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात ॲड. शंतनु धोर्डे व डॉ.रेणुका बनकर यांचीही व्याख्याने झाली. कोपरगाव शहरातील अनुभवी व प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ शंतनु धोर्डे यांनी दिल्ली निर्भया प्रकरणाला उजाळा देऊन पॉस्को कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी कशी झाली हे सांगितले.

या कायद्याअंतर्गत असणाऱ्या अनेक बाबी स्पष्ट करून मुलं-मुली दोघांनीही कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे? तसेच निर्भय बनण्यासाठी या कायद्यांची कशी मदत होऊ शकते हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे पटवून दिले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या व्याख्यात्या डॉ.रेणुका बनकर यांनी आहार, आरोग्य आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीतील सहसंबंध स्पष्ट करून यावरच आत्मविश्वास, आत्मनिर्भरता अवलंबून असल्याचे दाखवून दिले. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच व्यक्ती निर्भय राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

या अभियानातील तिसरे मार्गदर्शक अशोक शिंदे यांनी स्वसंरक्षण कसे करावे? याविषयी सांगून प्रात्यक्षिकाद्वारे बचाव व स्वसंरक्षणाचे धडे दिले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कला विभागाच्या उपप्राचार्या प्रा. उज्ज्वला भोर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे हेतू कथन केले. तर विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. माधव यशवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा चव्हाण यांनी केले. हा अभियान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. वैशाली सुपेकर, डॉ.योगेश दाणे,प्रा.चव्हाण, प्रा लोहोकने, प्रा. पेटारे,प्रा.जयश्री शेंडगे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक, शिक्षक -शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.