शेवगावात चोऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वाढला सुळसुळाट

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : गेल्या काही दिवसात शेवगावात चोऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीतील जनता व्यासपीठालगत असणाऱ्या छोट्या व्यावसायिकाची दोन दिवसात तीन दुकाने फोडण्यात आली. तर तीन ठिकाणी अयशश्वी प्रयत्न झाल्याने व्यावसायिकात घबराट पसरली आहे. पोलिसानी रात्रीची गस्त वाढवावी अशी सर्व स्थरातून मागणी होत आहे.

शुक्रवारी पहाटे एक ते दीडच्या दरम्यान येथील जनता व्यासपीठा समोरील सचिन शहाणे यांच्या सचिन ज्वेलर्सचे शटर उघडून छोटे गॅससिलिंडर, सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. मात्र, अद्याप त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतलेली नसल्याची माहिती शहाणे यांनी दिली.

जाहीद पठाण यांच्या अनमोल बुक सेंटर या दुकानाची दोन कुलुपे तोडून गल्यातील सुमारे एक हजार रुपये नेले आहेत. दादासाहेब जाधव यांचे श्रीदत्त इलेक्ट्रीकल्स व पप्पू विधाटे यांची सुपर मोबाईल शॉपी ही दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न झाला. याच व्यावसायिका समोर उघडयावर फळविक्री करणाऱ्या साखरबाई कुसळकर यांची छत्री, वजन काटा, फळांसह दोन कॅरेट, तसेच बचत गटाचे पैसे भरण्यासाठी जमा करून ठेवलेले रोख ८oo रुपये  असा जवळ पास चार हजाराचा ऐवज पत्र्याची टपरी फोडून चोरट्यांनी चोरून नेले.

एकाच रात्री शंभर फुटाच्या परिसरात एका पाठोपाठ एक चोऱ्या झाल्याने व्यावसायिकांनी मोठा धसका घेतला आहे. तर गुरुवारी रात्री एकच्या सुमारास  शेवगाव पाथर्डी रस्त्यावरील गौरव पितळे यांच्या जयराज मोबाईल शॉपीचे शटर उघडण्याचा अयशश्वी प्रयत्न झाला. चोरटे शटर उघडण्याचा प्रयत्न करत असतांना सायरन वाजल्याने चोरटे पळून गेले. तेथे एक चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.