खुनाच्या गुन्ह्यात लाला भोसलेला जन्मठेप

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी मामा-भाची जात असतांना कुविख्यात गुंड आरोपी लाला भोसले याने मामा नरेंद्र भोसले याच्या पोटात चाकूने वार करून खून केला होता. सदर खटला कोपरगाव न्यायालयात चालू होता. सदर खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोपीचे धाबे दणाणले असून चर्चेचा विषय ठरला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि.१७ मे २०१८ रोजी सायंकाळी प्रवरानगर येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र राजेंद्र भोसले व त्याची भाची कू. स्नेहल विलास चव्हाण हे घराकडे जात असतांना कुख्यात गुंड आरोपी लाला राजन भोसले याने मागील कारणावरून नरेंद्र यास शिवीगाळ करून, ‘तुला आता संपवतोच’ असे म्हणून त्याचे पोटात चाकूने वार केले होते. यामध्ये नरेंद्र गंभीर जाखमी झाला होता.

दरम्यान नरेंद्रची भाची स्नेहल ही मामाला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता तिच्या हाताला देखील चाकूचा वार लागला. यामध्ये तिच्या हाताच्या नसा कापल्यामुळे दोघे ही रक्तभांबाळ झाले होते. फिर्यादी कुणाल राजेंद्र भोसले हा तेथे ४० फुटावर उभा होता, भांडणाचा आवाज आला म्हणून घटनास्थळी गेला असता आरोपी लाला भोसले हा आरोपी ललित कुंजीर याचे मोटार सायकल वर बसून फरार झाले.

२०२३ मध्ये ऐन दिवाळीत याच न्यायाल्याने ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. आता पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने त्याला उजाळा मिळाला आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

फिर्यादी कुणाल भोसले याने ताबडतोब जखमींना प्रवरा हॉस्पीटल लोणी येथे उपचारासाठी दाखल केले. दोघांवरती औषधोपचार चालू असताना नरेंद्र राजेंद्र भोसले याचे दि.२२/०७/२०१८ रोजी निधन झाले. कुणाल भोसले याचे फिर्यादीवरून आरोपी लाला भोसले व ललित कुंजीर यांचे विरुध्द भा.द.वि. कलम ३०२, ३२४, ३२६, ५०४, ५०६, ३४ अन्वये लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांचे समोर चालू होता. यामध्ये सरकार पक्षाने १४ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी कुणाल भोसले, कू. स्नेहलसह इतर साक्षीदार, पंच, वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीने गुन्हात वापरलेला चाकू त्याच्या घराजवळील पाण्याच्या टाकीत टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.

घटना बघणारे साक्षीदाराचे जवाब, फिर्यादीचा जवाब, पंच यांची साक्ष, दोन वैदयकीय अधिकाऱ्यांची साक्ष व परीस्थिती जन्य पुरावा हे बघून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी लाला रंजन भोसले यास भा.द. वि. कलम ३०२, ३२४ नुसार जन्मठेपेची शिक्षा व १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी काम पहिले, लिपीक श्रीनिवास जोशी, पैरवी अधिकारी एन.एस. माळी सहायक फौजदार लोणी पोलिस स्टेशन यांनी कामकाजात सहकार्य केले.