बीएमटी स्कूल मध्ये ‘जल्लोष संस्कृतीचा’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : विद्यार्थ्यांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या बीएमटी स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावातील सुप्रसिद्ध उद्योगपती मनोज अग्रवाल, संजय भन्साळी तसेच कोपरगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय विश्वास पावरा हे उपस्थित होते. तसेच धर्म कुमार बागरेचा हेही उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्तीचे पालन केल्यास स्वतःचे व देशाचे भविष्य उज्वल होईल असे प्रतिपादन कोपरगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय विश्वास पावरा यांनी केले.

स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, संचालक राजेश ठोळे, संचालक संदीप अजमेरे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मकरंद निमोणकर यांनी अहवाल वाचन करून शाळेचा वाढत्या गुणवत्तेचा आलेख मांडला.

पाठ्यक्रमासह विविध कलाविष्कार आणि खेळांमध्ये तालुका, जिल्हा तसेच राज्य स्तरावर नैपुण्य दाखविणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमात केजी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

जल्लोष सांस्कृतिचा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य प्रकारात महाराष्ट्राच्या लोककलेतील गोंधळ, मंगळागौर यासारख्या देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्याभिषेक सोहळा सादर होत असताना संपूर्ण वातावरण जयघोषाने शिवमय झाले होते. प्रभू श्रीराम व शिवतांडव सारख्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निमोणकर सर व उपमुख्याध्यापिका वर्षा आगरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री धारणगावकर व मेघा गायकवाड यांनी केले. श्वेता भोपळे यांनी आभार मानले.