शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नितीनराव औताडे यांची निवड

बाळासाहेब रहाणे उपजिल्हाप्रमुखपदी तर तालुका प्रमुखपदी संजय गुरसळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोपरगाव तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून नुकताच उबाठा शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा नितीन औताडे यांनी दिला होता. तर तालुकाप्रमुख पदाचाही राजीनामा बाळासाहेब रहाणे यांनी दिला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला.

त्यांच्या कामाची चुणूक व राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता काल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा. श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेने नितीन औताडे यांची जिल्हाप्रमुखपदी, बाळासाहेब रहाणे यांची उपजिल्हाप्रमुख पदी तर कोपरगाव शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी संजय गुरसळ यांची निवड करण्यात आली.

कमलाकर कोते यांचीही जिल्हाध्यक्ष म्हणून फेर निवड झाली. नितिन औताडे यांच्यावर कोपरगाव श्रीरामपूर व नेवासा तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचे जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीचे पत्र त्यांना मिळाले आहे. बाळासाहेब रहाणे यांनी उबाठा शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची वर्णी शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदावर लागली आहे.

तर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी डाऊच खुर्दचे माजी सरपंच संजय गुरसळ यांना संधी मिळाली आहे. तर रावसाहेब थोरात यांचीही तालुका प्रमुख म्हणून फेर निवड झाली आहे. करंजीचे उपसरपंच शिवाजी जाधव यांची देखील शिवसेना जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदार संघात केलेले विकास कामे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निळवंडे कालव्याच्या निर्मितीसाठी आणलेला निधी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रातील विकास कामांची गती पाहून औताडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू अशी ग्वाही नितीनराव औताडे यांनी दिली