कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक सहजतेने इंग्रजी भाषेत आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. शहरातील चुल नाहिशी झाली, ग्रामीण भागातील बैल संपला त्यांच्या पाठोपाठ अनेक मराठी शब्द लोप पावले आहेत, मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने आपली संस्कृती जतन केली पाहिजे, असे विचार माजी नगराध्यक्षा, कवयित्री ऐश्वर्या सातभाई यांनी व्यक्त केले.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने व स्व.र.म. परिख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्वागत व प्रास्ताविक शाखेचे अध्यक्ष कवी कैलास साळगट यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाच्या संचालिका शोभना भाभी ठोळे होत्या. या प्रसंगी मनस्विनी पुरस्कार मिळाल्याबद्दल ऐश्वर्या सातभाई यांचा, वनिता मंडळाच्या अध्यक्षपदी वंदना चिकटे यांचा, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कवी कैलास साळगट यांचा, अंमळनेर येथील साहित्य संमेलनात सहभागी झाल्याबद्दल कवी प्रमोद येवले यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी साहित्यिक हेमचंद्र भवर, एड. श्रद्धा जवाद, कवी नंदकिशोर लांडगे, अनंत बर्गे, वंदना चिकटे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन कार्याध्यक्ष प्रा.डॉ. संजय दवंगे यांनी केले. आभार प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. समारंभासाठी ग्रंथपाल योगेश कोळगे कवी देवकर बाळासाहेब व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.