कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास कोपरगाव तालुक्यातून श्रीक्षेत्र कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज यांना खास निमंत्रित केले होते. हा संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील जनतेचा सन्मान असून, आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
या सोहळ्यास उपस्थित राहून प. पू. रमेशगिरीजी महाराजांचे महिनाभरानंतर कोपरगाव नगरीत आगमन झाल्यामुळे ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या म्हणीप्रमाणे सर्वत्र मंगलमय व आनंदाचे वातावरण आहे. समस्त भक्तांना रमेशगिरीजी महाराजांचे आशीर्वाद कायम मिळत राहो, अशा भावना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केल्या.
अयोध्या येथील नव्याने बांधलेल्या श्रीराम मंदिराचे उदघाटन व श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा गेल्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडला. या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहून प. पू. स्वामी रमेशगिरी महाराज यांचे बुधवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी कोपरगाव येथे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांची शहरातून भक्तिमय वातावरणात वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
युवा नेते विवेक कोल्हे यांनी प. पू. स्वामी रमेशगिरी महाराजांचे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या व संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करून संत पूजन केले व आशीर्वाद घेतले. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी रमेशगिरी महाराजांचे स्वागत केले. विवेक कोल्हे यांनी मिरवणुकीत सहभागी होत प. पू. रमेशगिरीजी महाराज व अन्य संतगण विराजमान झालेल्या रथाचे सारथ्य केले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज मंदिर येथे आयोजित स्वागत सोहळ्यास उपस्थित राहून युवानेते विवेक कोल्हे आणि आमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी महंत रमेशगिरी महाराज यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
विवेक कोल्हे म्हणाले, धार्मिक स्थळी देवकार्याला जाऊन अतिथी घरी परतल्यानंतर आपण त्यांचे पाय धुवून पूजन करत असतो. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराजांचा पदस्पर्श प्रभू श्रीरामांच्या पवित्र जन्मभूमीला लाभला. आपल्याला प्रत्यक्ष अयोध्येला जाता आले नसले तरी आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले हे आपल्या सर्वांचे परमभाग्य आहे.
‘मेरे राम आयेंगे’ या गाण्याप्रमाणे महिनाभरानंतर रामरूपी प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज आपल्यात परतल्याने सर्व कोपरगावकरांना व भक्तांना मोठा आनंद झाला आहे. त्यामुळे संत जनार्दन स्वामी भक्त मंडळ व तमाम भक्तांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या आनंदोत्सवात सहभागी होऊन प. पू. रमेशगिरीजी महाराजांच्या रथाचे सारथ्य करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे सांगून सर्व भक्तगण प्रदोष व इतर दिवशी प. पू. रमेशगिरीजी महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेत असतात. यापुढेही त्यांचे समस्त कोपरगावकर व भक्तांना कायम आशीर्वाद मिळत रहावेत, अशी प्रार्थना त्यांनी परमेश्वरचरणी केली.
मिरवणुकीदरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवष्टी करून प. पू. रमेशगिरीजी महाराजांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, स्वामी रमेशगिरीजी महाराज की जय आदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. विवेक कोल्हे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व छत्रपती शिवाजी स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन केले. ही मिरवणूक राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे पोहोचल्यानंतर प. पू. रमेशगिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले. तेथे विवेक कोल्हे उपस्थित राहिले.
जनार्दन स्वामी महाराज भक्त मंडळाच्या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनात विवेक कोल्हे यांनी विशेष सहकार्य केले, त्याबद्दल रमेशगिरीजी महाराजांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रवचनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प. पू. दत्तगिरीजी महाराज, प. पू. कैलासनंदगिरीजी महाराज, प. पू. शेषगिरीजी महाराज, प. पू. निवृतीनाथगिरीजी, प. पू. गोवर्धनगिरीजी महाराज, प. पू. राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, प. पू. शारदानंदगिरी माताजी महाराज,
प. पू. मोरे महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी स्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलासराव कोते, सचिव अंबादासराव अंत्रे, विश्वस्त अनिल जाधव, रामकृष्ण कोकाटे, शिवनाथ शिंदे, आशुतोष पानगव्हाणे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, संत जनार्दन स्वामी भक्त परिवार, भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.