जिरायती भागाची कामधेनु काळे परिवारामुळे जिवंत – बाबुराव थोरात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : कोपरगाव तालुक्यातील वरच्या भागातील जिरायती गावांना वरदान ठरणारी व जिरायती भागाची कामधेनु असलेली उजनी उपसा जलसिंचन योजना काळे परिवारामुळे जिवंत असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात यांनी केले आहे. उजनी उपसा जलसिंचन चारीसाठी पाणी उचल सुरु करण्यात आले या प्रसंगी बाबुराव थोरात बोलत होते.

२००४ पूर्वी न परवडणारी (नॉट फिजिबल) असा ठपका ठेवून बासनात गुंडाळून ठेवलेली उजनी उपसा जलसिंचन योजना २००४ ते २०१४ या दहा वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांनी पदरमोड करून यशस्वीपणे चालवून दाखविली परंतु २०१४ ला झालेल्या सत्तांतरामुळे या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना २०१४ ते २०१९ पर्यंत पुन्हा बंद राहिली. मात्र, २०१९ ला वरच्या भागातील नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करतांना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाउल ठेवून आ.आशुतोष काळे यांनी देखील या योजनेकडे व्यक्तिश: लक्ष घालून आर्थिक झळ सोसून २०१९ पासून आजतागायत हि योजना अविरतपणे सुरु ठेवल्यामुळे धोंडेवाडी व वरच्या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे काळे कुटुंबाला खऱ्या अर्थाने पाणी प्रश्नाची जाण असल्याचे दिसून येत आहे.

निळवंडेच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या वरच्या गावातील नागरिकांना निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी मिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी स्वत: निळवंडे डाव्या कालव्यावर दिवसभर ठाण मांडून हे पाणी लाभधारक गावात पोहचविले एवढेच नव्हे तर अतिरिक्त दिड टीएमसी पाणी देखील मंजूर करून घेतले आहे. निळवंडेचे पाणी या जिरायती भागात आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होवून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे.

त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असतांना देखील आजवर वरच्या गावातील नागरिकांना दरवेळी जाणवणारी पाणी टंचाई यावेळी जाणवली नाही. अन्यथा जानेवारीपासूनच जवळके-धोंडेवाडी परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होवून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली असती व प्रशासनाला देखील वरच्या भागात टँकर सुरु करावे लागले असते. परंतु आ. आशुतोष काळे यांच्या दूरदृष्टीमुळे हि वेळ या जिरायती गावातील नागरिकांवर आली नाही. त्यामुळे वरच्या भागातील जनता आ.आशुतोष काळे यांना कधीच विसरणार नाही असे गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात यांनी म्हटले आहे.