गौतम पब्लिक स्कूलचा एनसीसी स्काऊट व गाईड संयुक्त कॅम्प उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलचे एन.सी.सी.स्काऊट व गाईड यांचा संयुक्त कॅम्प दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राघवेश्वर मंदिर कुंभारी येथे उत्साहात पार पडला. शाळेचे इयत्ता नववीतील एन.सी.सी.स्काऊट व गाईडचे एकूण १५० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. कॅम्पची सुरुवात राघवेश्वराचे दर्शन घेऊन व मंदिराचे ह.भ.प.महंत उंडे महाराज यांच्या आध्यात्मिक प्रवचनाने झाली.

सकाळच्या सत्रात एन.सी.सी.स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेश फलक घेऊन घोषणा देत कुंभारी गावातून भव्य रॅली काढण्यात येवून विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराची स्वछता केली. दुपारच्या सत्रात जेवणानंतर जवळच असलेला गोदावरी नदी घाट व नदी पात्राची साफसफाई केली. यावेळी उंडे महाराज स्वतः देखील साफ सफाई मध्ये सहभागी झाले. संध्याकाळच्या सत्रात शाळेचे प्राचार्य नूर शेख व शाळेचे माजी विद्यार्थी रामराव साळुंके यांनी सपत्नीक कॅम्पला भेट दिली यावेळी रामराव साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्राचार्य यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. संध्याकाळची आरती प्राचार्य यांच्या हस्ते झाल्यानंतर उंडे महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी बोलताना ह.भ.प.उंडे महाराज यांनी विदयार्थ्यांना आई-वडील, गुरू साधू संत यांचा आदर करण्याची शिकवण दिली. यावेळी ह.भ.प.उंडे महाराज यांनी संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे व सचिव चैताली काळे यांचे वैयक्तिक लक्ष असल्याने गौतम पब्लिक स्कुलचा नावलौकिक महाराष्ट्रभर असल्याचे सांगून व्यवस्थापन व प्राचार्य यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आली. 

यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः भोजनाची तयारी करून सुग्रास भोजनाचा आनंद प्राचार्य यांच्या समवेत घेतला. यामध्ये कॅम्पची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.सी. सीटीओ उत्तम सोनवणे तर आभार स्काउट इन्चार्ज नासीर पठाण यांनी मानले. कॅम्पच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. सीटीओ उत्तम सोनवणे, स्काऊट इन्चार्ज नासिर पठाण, गाईड इन्चार्ज सुनिता शिंदे, महिंद्रा लोकनार यांनी काम पाहिले.

तसेच शाळेचे माजी विद्यार्थी ओमप्रकाश दळवी यांनी आपले योगदान दिले. शाळेच्या वार्षिक एन.सी.सी. स्काऊट व गाईड कॅम्प यशस्वीतेबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली काळे तसेच सर्व संस्था सदस्य यांनी शाळेचे प्राचार्य नूर शेख, एन.एन.सी. सीटीओ, स्काऊट मास्टर व गाईड इन्चार्ज तसेच शिबिरात सहभागी झालेले सर्व कॅडेट्स यांचे कौतुक करून अभिनंदन केले.