बांधकामास स्थगिती द्यावी, कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा हशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  तालुक्यातील ताजनापूर ग्रामपंचायत हद्दीतील रिकाम्या जागेत होत असलेले अतिक्रमण रोखण्यात यावे यासाठी सन २०२१ पासून काही ग्रामस्थांसह तीन ग्रामपंचायत सदस्य सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, वेळोवेळी अर्ज, विनंती, उपोषण, आंदोलन करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आता तर या जागेवर पक्के सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू झाल्याने बुधवारी (दि.२८) या सदस्यांनी अनेक ग्रामस्था समवेत पंचायत समितीमध्ये येऊन पुनश्च लेखी निवेदनाद्वारे स्मरण करून देत सनदशीर मार्गाने हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या जागेवर अनिल गिऱ्हे व भागवत गिऱ्हे या ग्रामस्थांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम सुरू केल्याने अप्पासाहेब वीर, बनकर गायकवाड, रेखा गोरख कौसे या ग्रामपंचायत सदस्यांनी व काही ग्रामस्थांनी बुधवारी सुरू असलेल्या बांधकामाचा ग्रामसेवकांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून तोही गटविकास अधिकारी राजेश कदम यांना दिलेल्या निवेदना सोबत जोडला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, या जागेवर सन २०२१ पासून अतिक्रमण होत असून ते रोखावे म्हणून प्रयत्न होत आहेत. ३० डिसेबर २१ ला महाराष्ट्र अधिनियम १९५९ कलम ५३ (२) अ नुसार कारवाईची नोटीस देण्यात आली होती. त्यावर काही काळ बांधकाम थांबविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी अतिक्रमणावरील बांधकाम परत सुरू झाले. ते पाहून इतरही काही जण अतिक्रमण करण्यास सरसावले आहेत.

त्यामुळे १० एप्रिल २३ ला अतिक्रमण विरोधी मोहीमअधिक सक्षम करण्यात येऊन या ग्रामपंचायत सदस्या समवेत अनेक ग्रामस्थ पंचायत समिती समोर उपोषणास बसले. तेव्हा तत्कालीन गटविकास अधिकारी महेश डोखे यांनी ग्रामसेवकास आदेश देऊन संबंधित बांधकाम निष्कासीत करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर उपोषण आंदोलन स्थगीत करण्यात आले होते. मात्र, डोखे यांची बदली झाल्यानंतर हे बांधकाम परत सुरु झाले.

त्यावर हे अतिक्रमण त्वरित काढण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने संमत करून २३ फेब्रुवारी २०२४ ला या संदर्भाची नोटीस बजावूनही २८ फेब्रुवारीला  बांधकाम पुन्हा जोमात सुरु करण्यात आले. तेव्हा ग्रामस्थांनी ग्रामसेवका समवेत चालू बांधकामाचा पंचनामा करून हरकत नोंदवली असून गट विकास अधिकारी राजेश कदम यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देवून या बांधकामास स्थगिती द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा हशारा देण्यात आला आहे.