आगामी निवडणुकीत अजित पवार गटाला जनतेचे समर्थन मिळणार – सुरज चव्हाण


शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ :  राष्ट्रवादीचे  राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अधिक प्रगती व विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्याची घेतलेली भूमिका युवकांना भावली आहे. त्यामुळे अल्प सुचनेत अगदी एका दिवसात युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे यांनी शेवगावला आयोजित केलेल्या ‘अजितपर्व विजयी संकल्प मेळाव्या’ साठी जिल्ह्यातून सहभागी झालेल्या युवकांचा प्रतिसाद उत्साह वाढविणारा असून आगामी होणाऱ्या निवडणुकीत अजित पवार गटाला जनतेचे समर्थन निश्चीत मिळणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी येथे दिली.

आखेगाव येथील स्वराज मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या जिल्हा युवक संकल्प मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्याचा विकास साधायचा असेल तर चांगल्या मंडळी सोबत जाण्यात काहीच गैर नाही. त्यातून सर्वसमावेशक विकास घडणार आहे. सध्या राज्याच्या राजकारणात सर्वच प्रमुख राजकीय पक्षाची एकमेका सोबत आघाडी झाली आहे. विचार धारा जागृत ठेवून अजित पवारांनी घेतलेली भूमिका राज्याच्या कल्याणासाठीच आहे. यामुळे आगामी निवडणुकीत युवकांची जबाबदारी महत्वपूर्ण असल्याने युवक संघटना अधिक भक्कम करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व विधिमंडळ सदस्या पैकी ८० टक्या पेक्षा जास्त सदस्यांचे अजित पवारांना समर्थन असल्याने पक्ष व चिन्ह त्यांनी पळविल्याच्या टीकेला युवकांनी त्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता व्यक्त करून त्यांनी काही लोकांना जाणीवपूर्वक भावनिक मुद्यावर बोलून कायम प्रसिद्धी हवी असते. असे सांगून शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड व आ. रोहित पवार यांचेवर सडकून टीका केली. भाजपला पाठिंबा देण्यासाठी सर्वप्रथम रोहित पवारांनीच आघाडी घेतली होती. मात्र अजित पवार भाजपा सोबत गेल्यामुळे शरद पवार गटांची संपूर्ण जबाबदारी आपणास मिळेल या हेतूने रोहित पवार यांनी आपली भूमिका बदलली अशी टीका त्यांनी केली.

प्रारंभी ढोल ताशाच्या निनादात फटाके व तोफाची सलामी देत चव्हाण यांचे हृद्य स्वागत करण्यात आले. युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण ) नंद्कुमार मुंढे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मायकवाड, युवक संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संजय कोळगे, प्रदेश उपाध्यक्ष मितेश नहाटा यांनी ही यावेळी युवकांना मार्गदर्शन केले.

        यावेळी सरचिटणीस अमर पाटील, व्यंकटेश देशमुख, रणजित नरोटे, संतोष धुमाळ, शहराध्यक्ष रोहन फडके, युवा नेते अजिंक्य लांडे, सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल वारे, विशाल गायवाड, गोविंद किडमिंचे यांचे सह जिल्ह्यातून आलेल्या युवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्र संचलन दिपक कुसळकर यांनी केले. रोहन फडके यांनी आभार मानले.