मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात जि.प. प्राथमिक शाळा जिल्हयात प्रथम

शेवगाव प्रतिनिधी, दि.०५ :  ग्रामिण भागात असूनही लोकसहभागातून विविध भौतिक, शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या तालुक्यातील वाघोली येथील जि.प. प्राथमिक शाळेने राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक मिळविला असून  अकरा लाख रुपयांचा पुरस्कार देऊन शाळेस सन्मानित करण्यात येणार आहे.

वाघोली शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असून एकूण ४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक एकर क्षेत्रावर ग्रामपंचायत, लोकसहभाग व काही  कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेत सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. शाळेच्या दर्शनी भागातील रंगीत बुंध्यानी सजलेले पाम वृक्ष, दुतर्फा  शोभिवंत, फुलझाडांतून जाणारे पेव्हर ब्लाँकचे रस्ते, तैलरंगातील शैक्षणिक मजकुराने सजवलेली बालस्नेही शालेय इमारत, डिजिटल शैक्षणिक फलकांनी अध्यापनासाठी सहजसाध्य केलेल्या वर्गातील भिंती, संरक्षकजाळ्या, ठिबकद्वारे सर्व झाडांसाठी केलेले जलव्यवस्थापन, संगणक संच, प्रिंटर, क्रिडा साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके, स्कुलबँग अशा सुविधा विद्यार्थ्याना उपलब्ध आहेत.

सरपंच सुस्मिता भालसिंग, आदर्श गावचे प्रणेते उमेश भालसिंग, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ व सदस्य यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक प्रमिला गोरे सहशिक्षक महेश आहेर, तसेच माजी विद्यार्थ्यां समवेत समन्वय साधून सर्वांचा सहभाग घेऊन ही शाळा आदर्श बनविली आहे. त्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्यात आले असून व्यवसाय भेट, तज्ञ व्यक्ती व्याख्यान, दप्तरमुक्त शनिवार, खाद्यमहोत्सव, आठवडे बाजार, पुस्तक प्रदर्शन, स्वच्छता माँनिटर, जीवनशिक्षण ग्रंथदिंडी, पर्यावरणपुरक वस्तू व मुर्ती कार्यशाळा, प्रासंगिक सणोत्सव आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

शाळेतील बचत बँक, सानेगुरुजी वाचनालय, परसबाग, अमृतवाटीका, वृक्षसंगोपन, परिपाठ, पोषण आहार, फळवाटप, शिल्लक अन्नाची पक्षासाठी विल्हेवाट याचे सर्व व्यवस्थापन विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळाद्वारे केले जाते. शाळेने मंथन, प्रज्ञाशोध, शालेय क्रिडा स्पर्धा, विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, लेखन, वक्तृत्व स्पर्धा याचे आयोजन करून विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरावर सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

शाळा परिसर शेकडो फळझाडांनी बहरला आहे, त्यातून पिकणाऱ्या रामफळ, सिताफळ, नारळ, चिकू, आवळा, पेरू, मोसंबी, संत्री या फळांचा विद्यार्थ्यांना दिला जाणारा पुरक आहार, हिरव्यागार परसबागेतील भाजीपाला वापरून बायोगॅसवर शिजवला जाणारा सकस पोषण आहार, लाल माती टाकून आखलेली प्रशस्त क्रिडांगणे, वृक्षसंवर्धनासाठी लागणा-या जैविक खतनिर्मितीसाठी गांडूळ खत प्रकल्प, सोलर प्रकल्पातून मिळणारा अखंडित वीजपुरवठा, स्मार्ट इंटरएक्टीव्ह बोर्डच्या मदतीने सुरु असलेले विद्यार्थ्यांचे तंत्रस्नेही अध्यापन अशा आदर्श शाळेचे चित्र वाघोलीत प्रत्यक्ष अवतरले आहे.

शाळेच्या वाटचालीमध्ये गटविकास अधिकारी राजेश कदम, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, युवा नेतृत्व उमेश भालसिंग, विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, एकनाथ पटेकर, केंद्रप्रमुख सुभाष नन्नवरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.