कोपरगाव बेट कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ :  सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव बेट भागातील प्रति त्रंबकेश्वर समजल्या जाणां-या कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरू असुन अंतर्गत साफ सफाई व रंग रंगोटीचे काम पुर्ण झाले आहे, भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या पर्वकाळात दर्शन सोहळयासाठी उपस्थित रहावे असे आवाहन बेटवासिय व अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश सचिव व कचेश्वर देवस्थानचे वंशपरंपरागत व्यवस्थापक पुजारी रमेश उर्फ काशिनाथ भाउराव क्षीरसागर यांनी केले आहे. 

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कचेश्वर मंदिर अतिशय पुरातन व ऐतिहासिक आहे त्याच्या दुरूस्तीबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच पुरातन वास्तु विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. तीर्थक्षेत्र अंतर्गत या देवस्थानचा विकास व्हावा अशी असंख्य भाविकांची मागणी आहे.

गुरू शुक्राचार्य यांच्याकडुन संजीवनी मंत्राची दिक्षा कचेश्वरांनी येथेच घेतली. संपुर्ण भारतभूमीत कोपरगाव बेट भागात कचेश्वराचे हे एकमेव मंदिर आहे. शिवरात्रीनिमीत्त साफ सफाई स्वच्छता पुर्ण करण्यांत आली आहे.

पुण्यक्षेत्र पुणतांबा चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यास जातांना कचेश्वरी संत निवृत्तीनाथ, बहिण मुक्ताई, पंढरीचा पांडुरंग यांनी मुक्काम करून पुढे नेवासा येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख नामदेव गाथेत असुन या स्थानाला विशेष महत्व आहे. ब्रम्हलिन शिवभक्त अरविंद महाराज हे कचेश्वरी नियमीत दर्शनास येवुन त्याबाबतचा प्रचार प्रसारात अग्रेसर असायचे.

त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्री होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम कचेश्वरी केल्यास सिध्द होतात असे प्रमाण वर्षानुवर्षे मानले गेले आहे. यास्थानावर कालसर्पशांती, त्रिपींडी, नारायण नागबळी, ग्रहशांती, विवाह आदि धार्मीक कार्यकम विनामुहुर्त होतात.

 ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी कचेश्वरी छत्रीचा जीर्णोध्दार करून रूद्रयाग करत या स्थानाची माहिती संपुर्ण भारतभर पसरविली. त्यांचे येथे अनंतकाळ वास्तव्य होते. पाचशे वर्षाच्या इतिहासात अयोध्येत भगवान श्रीरामप्रभुचे मंदिर उभे राहिले त्याची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली.

त्यानिमीत्त जगात हा सोहळा पार पडला त्यावेळेपासूनच कचेश्वर देवस्थानची स्वच्छता करून महाशिवरात्रपर्वकाळात हे स्थान अधिक सज्ज ठेवले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी कचेश्वरी दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन कोपरगाव बेटवासियांनी केले आहे.