कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ :- लायन्स, लिनेस व लिओ क्लबने कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, फ्लोरा एक्स्पो व प्लानिटोरीअम असे विविध उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या माध्यमातून कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळाली असून सामाजिक कार्याबरोबरच छोट्या-मोठ्या व्यवसाय उद्योगाला उभारी देण्याचे काम ‘बिझनेस एक्स्पो’च्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार आमदार काळे यांनी काढले आहे.
लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना प्रायोजित ‘बिझनेस एक्स्पो २०२४’ चे उदघाटन आ. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी लायन्स, लीनेस व लिओ क्लबने नेहमीच विविध उपक्रम राबविले आहेत. छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना देवून कोपरगावच्या बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणायचे हा तुमचा आणि माझा एकच उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, व्यापारी संकुल व शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसह व्यवसायिकांच्या दुकानापर्यंत जाणारे रस्ते विकसित करण्यावर भर दिला.
कोपरगावकरांच्या आशिर्वादाने ५ नंबर साठवण तलावाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. वितरण व्यवस्थेचे देखील काम प्रगतीपथावर असून लवकरच कोपरगावकरांना नियमित पाणी मिळणार आहे. कोपरगाव शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांच्या कामाचा अनुशेष मागील साडे चार वर्षात भरून काढल्यामुळे कोपरगावची धुळगाव ओळख पुसून विकसित कोपरगावच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे.
कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी देखील १९१ कोटी निधी आणून हे देखील काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात आपणा सर्वांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनानुसार कोपरगावचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना सोयी-सुविधा व संधी देवून त्यांचे हित जोपासले जाणार आहे. कोपरगाव शहरासाठी बस स्थानक परिसर तसेच बाजार तळ, कोपरगाव नगर परिषदसमोर व पोस्ट ऑफिस या ठिकाणी व्यापारी संकुलासाठी निधी मिळविला असून हे काम देखील लवकरच सुरु होणार आहे.
अहमदनगर शहर सोडल्यास कोपरगाव शहराचा रेव्हेन्यू जिल्ह्यात एक नंबर झालेला आहे. यावरून कोपरगाव शहराची विकासवृद्धी झाली असल्याचे सिद्ध होत आहे. कोपरगाव शहर जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात नंबर एकवर घेवून जायचे आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत मात्र त्याबाबत तुमच्या संकल्पना, योजना माझ्यासाठी मार्गदर्शक असून तुमच्या संकल्पना, योजना व माझ्या प्रयत्नातून कोपरगावला विकासाच्या यशोशिखरावर घेवून जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड, लिनेस क्लबच्या अध्यक्षा रोशनी भट्टड, लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे आदींसह, लायन्स, लिनेस व लिओ क्लबचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.चैतालीताई काळेंच्या संकल्पनेतून महिलांची बाईक रॅली–
चौकट:- ‘लायन्स, लिनेस व लिओ क्लब’ दरवर्षी कोपरगाव एक्स्पो च्या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडत असतात. यावर्षी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधत ‘बिझनेस एक्स्पो २०२४’ च्या उदघाटन समारंभापुर्वी महिलांच्या बाईक रॅली ची संकल्पना मांडली. त्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते श्री साईबाबा तपोभूमी पर्यंत काढण्यात आलेल्या महिलांच्या बाईक रॅलीमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला. सौ. चैतालीताई काळे यांनी देखील या रॅलीत सहभागी होवून महिलांचा उत्साह वाढवला.