शेवगाव प्रतिनिधी, दि.८ : शेवगाव तालुक्याला शिवालयाची रामायण, महाभारत कालीन प्राचिन परंपरा आहे. पूर्वभागातील गोळेगाव येथील काशिकेदारेश्वर हे शिवालय रामायण कालातील तर घोटण येथील श्री मल्लिकार्जूनेवर महादेवाची स्थापना मल्लिक ऋषी व अर्जुनाने केली आहे. या शिवाय धाकटे शिखर शिंगणापूर म्हणून लौकिक असलेल्या माळेगाव ने येथील श्री महादेव देवस्थानाला ऐतिहासिक परंपरा आह
या देवस्थानासह गुंफा येथील श्री काळेश्वर देवस्थान, शेवगावातील धनगर गल्लीतील श्री महादेव मंदिर, खालची वेस परिसरातील छत्रीचा महादेव आदि देवस्थाने शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटेपासूनच हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेली.
गुंफाच्या काळेश्वर मंदिरात माजी आ.चंद्रशेखर घुले व माजी जी.प. अध्यक्षा राजश्री घुले या उभयतांच्या हस्ते महाअभिषेक करून आरती करण्यात आली. यावेळी प्रभाकर महाराज कावले, महेश महाराज काळे, राम महाराज, ज्ञानेश्वरचे संचालक सखाराम लव्हाळे, बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, राहूल बेडके, सतिश पवार यांचेसह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.
माळेगावनेच्या देवस्थानात महादेवाला पहाटे पैठण येथील गंगाजलाने व ओम नमोशिवाय अखंड जपाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हभप पाडूरंग महाराज जुंबड यांचे हरीकीर्तन झाले. येथे दिवसभर दर्शनासाठी भाविकाची गर्दी उसळली होती. माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, देवस्थान समितीचे विश्वस्त बाबा वाकडे, जगन्नाथ गावडे, सोमनाथ वीर, गोरक्ष भिसे आदीसह परिसरातील भाविक उपस्थित होते.
तालुक्यातील नागलवाडी येथील श्री. क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, विष्णुसहस्त्रनाम, गाथा भजन श्रीराम कथा हरिपाठ, हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी बाबागिरी महाराजाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल्याचे कीर्तन पार पडले.