राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेकडून दखल खड्डे बुजविण्यास प्रारंभ

कोपारगाव प्रतिनिधी, दि.१३ :- कोपरगाव शहरातील धारणगाव रोड ते कोपरगाव बस स्थानक या रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे अपघात घडू लागले होते. त्या निषेधार्थ कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भर दुपारी उन्हात रस्त्यावर बसून केलेल्या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेकडून दखल घेवून खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांसाठी निधी देवून अनेक रस्त्यांचे रुपडे पालटले असले तरी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव रोड ते कोपरगाव बस स्थानक या रस्त्यासाठी दोन कोटी निधी देवून देखील संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ केल्यामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा लहान मोठ्या अपघातास कारणीभूत ठरत होता.

त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार (दि.१२) रोजी दुपारी भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलन करीत याकडे पालिकेचे लक्ष वेधले होते. नागरिकांना या खड्ड्याचा त्रास होवू नये यासाठी हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा याबाबत उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांना निवेदन दिले होते.

त्यावेळी सबंधित ठेकेदाराला सूचना करून लवकरात लवकर पडलेला खड्डा बुजविण्यात येईल अशी ग्वाही कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली होती. त्याबाबत कोपरगाव नगरपरिष तातडीने कार्यवाही करतांना खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.