कोपरगाव प्रतिनधी, दि. १७ : माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त चासनळी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थिती राहून तपासणी करून घेतली. यावेळी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून नागरिकांची आस्थेने विचारपूस केली व रुग्णांना दिलासा देत मोतीबिंदू दृष्टी दोष असलेल्या अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत स्व.कोल्हे यांच्या स्मृती त्यांच्या पश्चात आरोग्य सेवेचा वसा घेऊन कोल्हे कुटुंबाकडून जतन केल्या जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
चासनळी येथे संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले.चासनळी ,रवंदे, मळेगाव थडी, सांगवी भुसार,धमोरी, मोर्विस,मायगाव देवी,मंजूर,हांडेवाडी,कारवाडी, वडगाव बक्तरपुर आदीसह परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या दृष्टीला अडसर असणाऱ्या मोतीबिंदू या नेत्रदोषाचे निराकरण होण्यासाठी तपासणी करून घेतली.
ज्येष्ठ नागरिक मुख्यतः दृष्टी कमकुवत होऊन त्रस्त होतात. योग्य वेळी उपचार होऊन जर असे नेत्र दोष दूर केले तर डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होते. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या उक्तीला प्राधान्य देत हा उपक्रम राबवून हजारो रुग्णांना दिलासा देण्याचे काम संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे.
युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत फिरता दवाखाना, आरोग्य सेवेची तत्पर मदत, मोफत रुग्णवाहिका सेवा, अनेक आरोग्यविषयक शिबिरे यातून कोल्हे कुटुंब जणसेवेत पुढाकार घेत असते. स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जीवनपट हा गोरगरीबांना सेवा देण्याचा ठरला आहे. अडल्या नडल्या व्यक्तीला आधार देऊन उभारी देण्याचे व्रत त्यांच्या स्मृती जपत सुरू आहे.
२० मार्च संवत्सर व २५ मार्च पोहेगाव येथे पुढील शिबिर पार पडणार असून त्या पंचक्रोशीतील व इतरही गरजू रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेत आपली दृष्टीची काळजी घेता येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रकांत चांदगुडे, अशोकराव आहेर, व्हा.चेअरमन मनेष गाडे, विश्वास गाडे, गोरख कोकाटे, पवन चांदगुडे, विनायक गाडे, कैलास चांदगुडे, डॉ. भरत हेकरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.