पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी वैतरणा वळण योजना – मच्छिंद्र टेके

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असुन त्यात पाण्याची समृध्दी वाढविण्याकरीता पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवावे म्हणून नगर-नाशिकसह मराठवाडयातील सर्वांनी मागणी केली त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटरग्रीड योजनेअंतर्गत वैतरणा मुकणे वळण योजनेच्या कामाला गती दिली तेंव्हा ईगतपुरी भागातील शेतक-यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे या कामाला विरोध करू नये असे कळकळीचे आवाहन गोदावरी पाट पाणी बचाव समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी केले आहे. 

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, पाणीप्रश्नाचे अभ्यासक व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी यावी यासाठी १९६८ ते २०२२ पर्यंत सातत्यांने संघर्ष करत शासनांस विविध उपाययोजना सुचवुन नगर नाशिक विरूध्द मराठवाडा हा पाटपाण्याचा प्रादेशिक वाद कायमस्वरूपी संपुष्टात यावा म्हणून पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या योजना शासन प्रशासन व जलसंपदा विभागाकडे सादर केल्या.

त्यानुसार सर्वेक्षण होवुन सन २००० मध्ये माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी विधीमंडळात मंजुरी घेतली. पाण्याचे प्रादेशिक वाद कमी झाले पाहिजे शेतक-यांच्या शेतीपिकासह शहरीकरणालाही पाणी मिळाले पाहिजे ही भावना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची होती त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

 उर्ध्व वैतरणा मुकणे वळण योजनेतुन १६.५० टी एम सी पाण्यांची नवनिर्मीती होणार आहे. मुकणे बुडीत क्षेत्रासाठी संपादित केलेल्या जमीनी शेतक-यांनी परत मागितल्या आहे त्यावर जलसंपदा स्तरावर कार्यवाही सुरू आहे. उर्ध्व वैतरणा मुकणे वळण योजना आणि मुळ मालकांना अतिरिक्त जमिनी परत करण्याची प्रक्रिया या दोन वेगवेगळया बाबी आहेत. उर्ध्व वैतरणा मुकणे वळण योजना कामाची धास्ती ईगतपुरी भागातील शेतक-यांनी घेवु नये.

यातुन कोणत्याही शेतक-यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग नाशिक यांनी देवुन त्याबाबत स्पष्टीकरणही प्रसिध्द केले आहे. मात्र चुकीच्या व अपु-या माहितीवर ईगतपुरी भागातील शेतक-यांनी उर्ध्व वैतरणा मुकणे वळण योजनेच्या कामास विरोध न करता नगर नाशिक मराठवाडा भागातील शेतकरीही आपले बांधव आहे व तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी होवुन त्याचा ईगतपुरीसह नगर नाशिक मराठवाडा भागास फायदाच होणार आहे हे त्रिवार सत्य आहे. 

पावसाळयात या योजनेचे काम होवु शकत नाही, आता उन्हाळा असल्याने व फेबुवारी ते मे पर्यंतच काम करण्यांस वाव असल्याने यात आताच विरोध झाला तर त्यात वर्ष निघुन जाईल आणि पुन्हा शेतक-यांना पाण्यांपासून वंचित रहावे लागेल तेंव्हा या कामास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन टेके यांनी केले आहे.

या वळण बंधाऱ्याचे काम झाल्याने कोणत्याही इतर जमिनी पाण्याखाली जाऊन बाधित होणार नाहीत. संभ्रम होऊन कुणीही गैरसमज करून न घेता आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी ही योजना पूर्णत्वास जाणे अतिशय भाग्यशाली बाब ठरणार आहे.