शेवगाव प्रतिनिधी, दि. ०५ : आधिक मास संकष्टी चतुर्थी निमित्ताने शुक्रवारी (दि. ४) तालुक्यातील आव्हाने बुद्रुकच्या श्री स्वयंभू गणपती देवस्थानात भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाची पर्वणी साधली. यावेळी राज्यभरातून हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.
यानिमित्ताने सकाळी सातला श्री गणेशाला गंगा जलाने स्नान घालण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष प्रा. मालोजीराव भुसारी, अंकुशराव कळमकर, वसंतराव देवधर यांचे हस्ते अभिषेक घालून, महाआरती करण्यात आली. सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या कालावधीत वृद्धेश्वर देवस्थान आळंदीचे ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री यांचे जाहीर हरिकीर्तन झाले.
सायंकाळी सहाला गणेश महाराज डोंगरे यांचे प्रवचन तर सायंकाळी सातला लक्ष्मणराव बोरुडे यांचे हस्ते महाअभिषेक घालून आरती करण्यात आली. रात्री दहाला पंचक्रोशीतील दादोबा देव एकतारी भजनी मंडळांनी जागर घातला. देवधर व बोरुडे या भाविकानी फराळ व महाप्रसादाची व्यवस्था केली होती.