कर्माची प्रामाणिकता हिच खरी भक्ती – महंत रामगिरीजी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या जीवन प्रवासात एक नाही अनेक क्षेत्रात काम केले नुसते काम केले नाही, त्या क्षेत्राला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे, एकाच व्यक्तीकडून सहकार, शिक्षण, पाणी, सामाजिक आदी अनेक क्षेत्रात इतक्या उत्तम प्रतीचे केलेले प्रामाणिक कार्य हे निश्चीतच ईश्वर भक्ती आहे, असे गौरोउद्गार महंत रामगिरी महाराज यांनी काढले आहे.  

ते सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त संगीतमय भागवत कथा सप्ताहाच्या प्रथम दिनी शनिवारी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या मैदानात बोलत होते. याप्रसंगी श्रीमती माई उर्फ सिंधुताई कोल्हे, नीलिमा पवार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ.स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, हभप उकिरडे महाराज, हभप लव्हाटे महाराज, ओमशांतिच्या चैताली, गणेश कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, कोल्हे कारखान्याचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संगीतमय सप्ताह होण्यापूर्वी सराला बेटाचे मठाधिपती प.पु.गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे साईबाबा तपोभूमी येथे आगमन झाले. तेथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मध्ये ढोल ताशे नागरे वाजत होते. महाराजांच्या रथापुढे महिला कलश घेऊन कार्यक्रम स्थळाकडे ही मिरवणूक निघाली होती.  या मार्गावर जागोजागी सडा रांगोळी काढण्यात आली होती. जागोजागी आरत्या घेतल्या जात होत्या. तहसील मैदानात मिरवणुक आल्यानंतर महाराज यांच्या हस्ते ध्वजाच्या यज्ञाची पूजा करण्यात आली. या सप्ताहाची विधीवत पूजा करून विवेक कोल्हे व रेणूका कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.

भागवत व्हावा ही विवेक कोल्हेची इच्छा : प.पु. रामगिरीजी महाराज – स्व.शंकरराव कोल्हे यांना भागवत सप्ताह करण्याची इच्छा होती, पण ती इच्छा हयात असतांना पूर्ण झाली नाही. मात्र, विवेक कोल्हे यांनी पाठपुरावा करून भागवत कथा सप्ताह आणला. ही खरी तळमळ होती. आमचे दिवसभरात दोन- तीन कार्यक्रम असतात. त्यामुळे हा सप्ताहाचा वेळ मिळाला आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे रामगिरी महाराज म्हणाले.

पुढे प.पु.रामगिरी महाराज म्हणाले की, कोणत्याही शुभकार्याची सुरवात ही मंगलचरणाने होत असते. त्यामुळे परमात्म्याचे चैतन्याशिवाय काम करू शकत नाही. भागवत कथा श्रवण  करणाऱ्या सेवकाचे शास्त्रीय नियमाचे विवेचन केले. भागवताची निर्मिती कशी झाली त्याचे वर्णन त्यांनी केले. कलयुगात मोक्ष प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग भागवत आहे. हे श्रवण करण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य असावं लागतं. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा समन्वय भागवतात आहे.

व्यासांनी १७ पुराणे लिहून पूर्ण केल्यानंतर त्यांना समाधान झाले नाही. म्हणून भागवताची निर्मिती त्यांनी केली. सर्व वेद, उपनिषदांचे लिखाण केले. याचे लिखाण करतांना त्यांनी चारही वेदांचे सार भागवतात त्यांनी लिहले आहे. म्हणून वेद वृक्षाचे परिपक्व फळ म्हणजे भागवत आहे. भागवताचे श्रवण हे भूलोकासाठी आहे. दुसऱ्या कोणत्याही लोकांस मिळालेले नाही. ब्रह्मसूत्र आणि गायत्री मंत्रापासून भागवताची सुरवात झाली आहे. स्वर्गाच्या अमृतापेक्षा श्रेष्ट भागवत अमृत असल्याचे प.पु.रामगिरी महाराज यांनी उद्बोधन केले. भागवत कथे निमित्ताने राधा कृष्ण यांचा भव्य देखावा उभारला असून हजारो नागरिक देखावा बघण्यासाठी सायंकाळी येत आहेत.