शेवगाव प्रतिनिधी, दि. २१: लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी गुरुवारी पहिल्यांदाच तालुक्यातील विविध गावचा धावता दौरा केला. यावेळी माध्यमासी वार्तालाप करतांना त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. आपण ‘कोणताही राजकीय हेतू डोक्यात ठेऊन आलो नाही. या भागात चालू असलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने व सांतवनपर भेटीसाठी आपण आलो आहोत.
निवडणुकीचे चित्र क्षणाक्षणाला बदलत असते. देखेंगे आगे आगे होता है क्या ?..आपण जनसामान्याच्या गाठीभेटी घेत असताना लोकभावना काय आहेत. हे जाणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ. खरा खेळाडू नेहमी स्पर्धेच्या तयारीत असतो. मी तर खेळाडूच आहे. काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्षातून भेटायला येतात मी त्यातला थोडाच आहे? असा सवालही त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता केला.
सतत जनतेत राहणारा, त्यांच्या सुख दुःखात सामील होऊन सहकार्य करणारा लोक हृदयातील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. हेच आपलं भांडवल आहे, असंही त्यांनी नमुद केले. आ. लंके यांनी गुरुवारी दिवसभर शेवगाव शहरासह तालुक्यातील अमरापूर, आखेगाव, थाटेवाड गाव, ढोरजळगाव, भातकुडगाव, भायगाव, जोहरापूर आदि गावाना भेटी देऊन लोकसंवाद साधला.
शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील स्व गोपीनाथ मुंढे, संत गाडगेबाबा, महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर यांचे पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. पुढे क्रान्ती चौकातील पावनगणपतीचे दर्शन घेऊन, ‘मायबाप जनतेला व शेतवकरी बांधवांना सुखी ठेव’ अशी प्रार्थना केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याचे पूजन करून तेथे लोकसहभागातून सुरु असलेल्या शिवस्मारकास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी शेवगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे एकनाथ कुसळकर, कॉग्रेसचे धनंजय उहाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल वरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, रिजवान शेख यांचे सह नागरिकाची मोठी उपस्थिती होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे हेही काहीकाळ पेठेत त्यांचे समवेत होते.
आ. लंके यांनी शेवगावातून पायी रोड शो केला. यावेळी अनेक सामान्य टपरीधारका समवेत फोटो सेशन झाले. पेठेतील कांबळे फ्रुटस्टॉलच्या काऊंटर वरून उडी मारून आत जाऊन फळविक्रेत्याची गळाभेट घेत त्याचे समवेत फोटो काढले.