महंत रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाला जनसागराची लक्षणीय उपस्थिती
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : उत्तुंग व्यक्तीमत्व, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देणं, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून काम करणं हा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा स्थायीभाव होता तो, राज्याच्या सदैव स्मरणांत राहणारा असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता शनिवारी (दि. २३ मार्च) त्यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली त्याप्रसंगी आमदार प्रा. राम शिंदे बोलत होते. प्रारंभी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, युवा नेते ईशान कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते संत पूजन केले.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, सप्ताहभर श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी भाविकांनी उच्चांकी गर्दीने सहभाग दिला हा आम्हा सर्व कोल्हे कुटुंबियांसाठी परमानंद आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेला वसा समर्थपणे पुढे चालवत आहोत.महिला सबलीकरणांतून बचत गटाच्या माध्यमांतून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात साली., कोरोना महामारीत विवेक कोल्हे, व त्यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने केलेले कार्य सामाजिक कार्याची देण आहे. स्वामी सहजानंदभारती पासून थेट नारायणगिरी महाराजांपर्यंत सर्वच घटकांचा सहवास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना लाभला हा सर्वांसाठी अमुल्य ठेवा आहे.
प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले की, आपण जेंव्हा गृहराज्यमंत्री म्हणून काम पहात होतो तेंव्हा तेव्हा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मंत्रालय, विधीमंडळात यायचे त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायला मिळाले. ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च तांत्रीक व अभियांत्रीकी शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अतोनात कष्ट घेतले.
महंत रामगिरी महाराज काल्याचे कीर्तनात बोलताना म्हणाले की, जेंव्हा आपल्यातील अहंकाररूपी गोष्टींचा त्याग होतो तेंव्हाच परमात्मा मिठी मारत असतो. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यासह केलेला काला ब्रम्हदेव, इंद्रदेव आदींना त्याचे आकर्षण होते. दुसऱ्यांना आनंद देतो तो नंद. परमार्थ हाच उद्देश ठेऊन कार्य करा त्यात स्वतः बरोबर समाजाचाही उत्कर्ष आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगांवी एप्रिल २०२२ मध्ये श्रीमदभागवत कथेचे आयोजन केले होते मात्र, त्याच्या आतच त्यांचे महानिर्वाण झाले त्यांची इच्छा नातू विवेक कोल्हे यांनी पूर्ण केली निश्चितच त्यांच्या आत्म्याला समाधान लाभेल.कर्तृत्ववान आजोबांचा आदर्श विवेकशिल नातू म्हणून विवेक कोल्हे यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. अतिशय देखणा सोहळा घडवून आणला. कोपरगाव शहरात प्रथमच इतक्या मोठ्या उपस्थितीत होणारी श्रीमद् भागवत कथा आयोजित केल्याबद्दल महाराजांनी कौतुक केले.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची ओळख आहे. पितृदोषाचे हरण करण्याचा कलीयुगातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीमद् भागवत होय. स्व.शंकरराव कोल्हे हे त्यांच्या महानिर्वानाच्या पंधरा दिवस अगोदर आपल्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर विविध विषयावर झालेली चर्चा आजही आपल्या स्मरणात आहे; त्यावेळी त्यांना आपल्या नर्मदा परिक्रमेची माहिती दिली होती. समाजातील समस्यांचा शोध घेऊन त्याचे निवारण करणे ही त्यांची खासीयत होती.
याप्रसंगी राजेश्वरानंद महाराज, राघवेश्वर महाराज, दामोदरबाबा महानुभाव, कैलासानंद महाराज, मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिकच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार,उद्योजक डॉ. मिलींदराव कोल्हे, कलावती कोल्हे, कृषी अभ्यासक दत्तात्रय कोल्हे, रविंद्र काळे, आ.किशोर दराडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, श्रीराज डेरे, जालिंदर वाकचौरे,मा.आमदार राजाभाऊ वाजे,अमृताताई पवार,नितीन औताडे, डॉ.राजेंद्र पिपाडा, धनंजय जाधव, शिवाजीराव गोंदकर, नितीन कापसे,कमलाकर कोते, महेंद्र काले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी आभार मानले.सेवा हाच धर्म ही भावना घेऊन कोल्हे कुटुंबाचे कार्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. हजारो भाविकांनी काल्याचा महाप्रसाद घेतला त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठान, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, विविध संस्थांचे पदाधिकारी,आजी माजी नगराध्यक्ष,नगरसेवक,हितचिंतक व ज्ञात अज्ञात घटकांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले.
अतिशय भव्य दिव्य प्रमाणात सात दिवस श्रीमद भागवत कथा पार पडली. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी रोज उपस्थिती दर्शविली त्याचा उच्चांक काल्याच्या कीर्तनात दिसून आला.तहसील कार्यालयाचे शेजारील दोन्ही मैदान भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरले त्याच वेळी मैदान अपुरे पडल्याने परिसरात हजारोंची गर्दी उभी होती असे चित्र कोपरगाव शहरात प्रथमच बघून अनेकांच्या तोंडी कोल्हे कुटुंबाच्या वतीने अध्यात्मिक विचार जोपासून केलेल्या आयोजनाचे कौतुक होते आहे.
तालुक्यातील हजारहून अधिक वारकरी भजनी मंडळ हजर होते त्यांचा भाविकांना असणारा भजन निनाद जागेवर अनुभवण्याचे भाग्य लाभले यावेळी सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला.