वहीवाटीचा रस्ता खुला न झाल्याने शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

शेवगाव तहसीलदाराचा आदेश असतानाही रस्ता खुला झाला नाही

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : शेवगावच्या तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश देऊन देखील भायगाव येथील तलाठी व मंडलाधिकारी यांनी वारंवार अर्ज विनंती करूनही तो खुला करून दिला नाही म्हणून उद्या बुधवार दिनांक २७ पासून पीडीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

        तालुक्यातील भायगाव येथील गट नंबर २४५ /१ या क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी असणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्यावरील गट नंबर २१७ / १ व २१७ / ३ मधील अतिकमण काढून बंद असलेला रस्ता  येण्या जाण्यासाठी खुला करावा यासाठी २०२२ मध्ये  तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी यांचेकडे केस क्रमांक २७ / २०२२ दाखल करण्यात आली. त्यानुसार तहसीलदार यांनी योग्य ती चौकशी करून स्थळ निरीक्षण व पंचनामा करून  सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासाठी दिनांक १३ / ८ / २० २३ रोजी आदेश पारित केला.

त्या आदेशा वर निर्धारित कालावधीत कोणी हरकत न घेतल्याने संबंधित शेतकऱ्याने दिनांक ११/ १२ /२०२३ रोजी रितसर रस्ता खुला करण्याकामी शेवगाव तहसिलदाराकडे अर्ज केला. त्यानंतर दिनांक ५ / २ /२०२४ पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना जाग आली. म्हणून पोलीस संरक्षण घेऊन दिनांक १९ / ३ / २०२४ रोजी रस्ता खुला करण्या संबंधीची नोटीस भातकुडगाव मंडलधिकाऱ्या मार्फत बजावण्यात आली. मात्र तो नुसता फार्स ठरला. त्यांनी रस्ता खुला केलाच  नाही. यासंबधी दत्तु चंद्रभान आगळे या पिडित वृद्ध शेतकऱ्याने तहसीलदार यांची समक्ष भेट घेऊन यासंबंधी माहिती दिली.

         अखेर तहसीलदाराच्या आदेशानुसार रस्ता खुला  करावा, आणि दिनांक १९/०३/२०२४ रोजी रस्ता खुला करणे कामी मंडलाधिकारी व भायगाव सजेचे कामगार तलाठी यांच्या विरुद्ध रस्ता खुला करणे कामी तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी तसेच मंडलाधिकारी यांना दि. १७ ते २० पर्यंत या कालावधीत रस्ता केस मधील सामनेवाले अगर रस्ता केसच्या संदर्भात कोणाकोणाचे फोन आले याचा तपशील घेऊन मंडलाधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. या मागण्यासाठी बुधवार दिनांक दि. २७ /०३/ २०२४ पासुन बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.  निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी,  प्रांताधिकारी, तहसीलदार,  पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.