शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : इयत्ता दहावीचा भूगोलचा पेपर सुरू असताना परीक्षा केंद्रात घुसलेल्या काही तरुणांनी महिला पर्यवेक्षीकेला एकेरी उल्लेख करून दमबाजी केली. बिनधास्त आमचे फोटो काढा पोलीस ठाण्यात आमच्या ओळखी आहेत असे म्हणत शिक्षकेला धमकावले. यावेळी काही युवक हातात काठ्या घेऊन परीक्षा हॉलमध्ये खुलेआम फिरत होते. हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील बालमटाकळी येथील भगवान माध्यमिक विद्यालयात मंगळवारी घडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. हा विषय परिसरात लोक चर्चेचा बनला.
तालुक्यातील बालमटाकळी येथील भगवान माध्यमिक विद्यालयात दहावीचे उपकेंद्र असून बोधेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे मुख्य परीक्षा केंद्र आहे. अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे बाहेरील तरुणांचा परीक्षा केंद्रावर मोठा त्रास असल्याची सहाय्यक केंद्र संचालक तथा प्राचार्य उत्तम रकटे यांनी सांगितले मंगळवारी भूगोलचा पेपर सुरू असताना जवळपास दहा ते पंधरा युवक अनाधिकाराने परीक्षा हॉलमध्ये घुसले. त्यांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. तर काही युवक हातात काठ्या घेऊन धुडघुस घालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परीक्षा केंद्रावरील महिला शिक्षिका पर्यवेक्षिकेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत असताना त्या युवकांनी महिला शिक्षिकेला अरेरवीच्याभाषेत दमबाजी केली. ही घटना व्हिडिओत टिपली गेली आहे. यावेळी तेथील इतर शिक्षक संबंधित महिला शिक्षिकेच्या मदतीला धावून गेले नाहीत. त्यांनी केवळ लांबून गंमत पाहत असल्याचे व्हिडिओत दिसून येते.
यावेळी संबंधित परीक्षा केंद्रावर एकही पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सहाय्यक केंद्र संचालक उत्तम रक्टे यांनी सांगितले की, हे व्हिडिओ आपण पाहिले आहेत परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने असा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पत्रही दिले होते. मात्र, एक दिवस पोलीस आले संबंधित महिला शिक्षिके कडून माहिती घेऊन याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
याबाबत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की सदर व्हिडिओ आपल्यापर्यंत आले असून संबंधित केंद्र संचालक व परिवेकक्षिके कडून माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.