टॅंकर मुक्त शेवगाव पुन्हा टँकर युक्त होणार

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ :  मागील वर्षी निसर्गाने शेवगाव तालुक्या वर अवकृपा केली. गेल्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्याच्या अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चारा पाण्याची दुर्भिक्षता जाणवू लागली आहे. या आठवड्यात तालुक्यातील आठ गावांनी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे गेले काही वर्ष टॅंकर मुक्त शेवगाव तालुका पुन्हा टँकर युक्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, यांनी तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घेऊन
तलाठी ग्रामसेवकानी आपापल्या गावातील पाण्याच्या सद्य परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुक्यातील थाटे, दिवटे, आखेगाव तितर्फा, हसनापूर, कोनोशी, वाडगाव, सोने सांगवी, गोळेगाव या आठ गावात तातडीने टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीच्या टंचाई विभागाकडे दाखल करण्यात झाले आहेत.

तालुक्यातील लाड जळगाव गावठाण परिसरातील खाजगी विहीर अधिग्रहण करण्याचा एक प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात सातशे हातपंप असून यापैकी सहाशे हात पंप सुरू आहेत. ज्या गावातून हातपंप बिघडल्याच्या तक्रारी येतात, त्याचा तातडीने पाठपुरावा करून त्याची दुरुस्ती करून निफटारा करण्याच्या सक्त सुचना तहसीलदार सांगडे व गटविकास अधिकारी कदम यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

दरम्यान पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अमरापुर येथील पाण्याच्या टाकीतून भरल्या जाणाऱ्या टँकरलाच पाणीटंचाईची झळ बसू लागल्याच्या तक्रारी आहेत. टाकीत पाणीच शिल्लक रहात नसल्याने येथेही टँकरची लांब अशी रांगच लागलेली असते.

मागील चार वर्षातील तालुक्यातील टॅकसी स्थिती सन २०१८-१९ मध्ये ६७ टँकर सुरू होते. २०१९-२० मध्ये एकही टँकर सुरू नव्हता. २०२१-२२ मध्ये पाण्यासाठी फक्त एक टँकर सुरू होता. २०२२-२३ मध्ये एकही टँकर सुरू नव्हता. तर २०२३-२४ मध्ये आठ गावांची  -टँकरची मागणी असून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची  भिती व्यक्त होत आहे.