भाजपाची केंद्रातील एकहाती सत्तामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलत आहे

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ :  लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून भाजपा, शिवसेना शिंदे गट, व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीने तसेच काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीने काही उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यात ४८ मतदार संघ असून यापैकी अनेक मतदार संघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. भाजपाची केंद्रातील एकहाती सत्ता व आक्रमक शैलीमुळे या निवडणुकीत वरचेवर मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलत आहेत.

यावेळी लोकसभेच्या पाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकात नगर दक्षिण मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्यात होत असल्याने येथे अद्याप निवडणूक  हालचाल धीम्या गतीने चालू आहे. भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी घोषित करून मैदानात उतरविले आहे. प्रारंभीच्या काळात भाजपा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलतील अशी चर्चा सुरू होती. या चर्चेनुसार डॉ. सुजय विखे यांना डावलून त्यांच्या पिताश्रींना, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती.

या चर्चेच्या समर्थनार्थ राधाकृष्ण विखे यांना देशपातळीवरील राजकारणात पाठऊन आगामी काळात राज्यात मुख्यमंत्री-उपमुख्य मंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांनी पुढे येऊ नये. म्हणून ही तजवीज असल्याचीही चर्चा होती. आणि ती पटण्यासारखी होती. मात्र, खा.डॉ. विखे यांनी उमेदवारी मिळवून त्यातील हवा काढून टाकली. खा. डॉ. विखे यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे.  

त्यामानाने त्यांच्याविरोधी अद्याप तरी कोणी उतरलेले नाही. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी घेऊन पारनेरचे आमदार  निलेश लंके ही निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित असले तरी, अद्याप त्यांचे तळ्यात मळ्यात चालू आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर आमदार लंके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गटात सामील झाले होते. त्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून ते अजित पवार गटाचे आघाडीचे लाभार्थी ठरले होते.

त्यामुळे त्यांची सध्या ओढाताण होत असल्याचे चित्र आहे. तशी लंके यांनी दोन्ही पवारांच्या भेटी घेऊन मतदार संघात फेरफटकाही मारला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरद पवार यांचे कट्टर समर्थक खा. डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या ऐतिहासिक महानाट्याचे विनामुल्य प्रयोग सादर करून मतदारांसी जवळीक साधली आहे. मात्र, कुठेही त्यांनी, ‘हो मी शरद पवार गटाकडून उमेदवारी करणार’ असे स्पष्टपणे सांगितले नाही. फक्त आपण सर्वसामान्य मतदारांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेणार असून, ‘जरा रुको देखो आगे आगे होता है क्या ?’ असे सुचित केले आहे.

यावरून त्यांच्याही डोक्यात निवडणूक लढविण्याचा खटका निश्चित असावा. फक्त परिस्थिती जुळून यावी व ती अधिक फायदेशीर कशी होईल याचा इंतजार ते करत असावेत. याचाच अर्थ असा की, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदाराची सरळ लढत निश्चित होणार आहे. अन्य कोणी उमेदवार असले तरी ते निवडणुक स्ट्रॅटीजी म्हणून मत विभाजनासाठी उभे राहिलेले वा केलेले उमेदवार असू शकतात.

खासदार डॉ. विखे यांनी पाच वर्षात कधीही मतदारसंघाशी फारसा संपर्क ठेवला नाही कोणाच्या सुखदुःखात सहभागी झाले नाहीत. असा त्यांचेवर आरोप होतो आहे. आता आले ते साखर, डाळ वाटप करण्यासाठी आणि त्यानंतर अनेक गावात झालेल्या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव २०२४  या प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, व अमृता खानविलकर, मानसी नाईक या नृत्यांगणांचे बहारदार कार्यक्रमातून थेट स्टेजवरूनच ‘हाय हॅलो करत’ मै हुं डॉन’ म्हणत दर्शन दिले अशा शब्दात ग्रामीण भागातील लोक त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त करताना आढळतात.

याशिवाय या मतदार संघात भाजपमध्ये लोकप्रतिनिधी व पक्षीय पदाधिकाऱ्यातील अंतर्गत असलेली धुसफूस लपवून राहिलेली नाही. भाजपाला आंतर्गत गटबाजीचे ग्रहणलागले आहे. लोकसभेसाठी इच्छूक असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना मानणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची विखे राजळे समर्थकांना डावलून शेवगावात बैठका झाल्या आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्याच्या भूमिका गुलदस्त्यात आहेत. यातून समन्वय साधत त्यांना मार्ग काढावा लागणार आहे.

विखे दक्षिणेत फक्त निवडणुकीपुरते येतात असाही त्यांच्यावर आरोप केला जातो. मात्र लोकनेते पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी या भागावर विशेष माया केली असून अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था उभारूनन उच्चवैद्यकीय शिक्षणासह अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा परिसरात उभारल्याने अनेकांना रोजगारा बरोबर दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले. त्यातून पिढ्या घडत आहेत.

त्यामुळे परिसरात विखे यांचे घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. तसेच स्व. विखे यांनी परिसरात छत्रपतींचा आदर्श ठेवून अनेक नातेसंबंध जुळवलेत. त्याही पलीकडे जाऊन अडचणीच्या काळात एकमेकासाठी धावून येणारी फळीच स्व. बाळासाहेब यांनी या परिसरातील गावागावात निर्माण केली आहे. त्यापैकी अनेक बुजुर्ग मंडळी आजही गावातील पारावर बसून असतात. त्यांचे आशीर्वाद खा.डॉ.विखे यांना मिळणार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.

आमदार लंके पारनेरचे असल्याने याच मतदारसंघातील असून त्यांना कोणताही राजकीय कौटुंबिक वारसा नाही. सामान्य माणूस हाच त्यांचा सखा, सोबती असल्याचे चित्र आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघाला आ.लंकेचा एक मोहटा देवी भक्त म्हणून चांगला परिचय आहे. अनेक वर्षापासून दरवर्षी पाच पन्नास लक्झरी बसेस मधून हजारो महिला भाविकांना मोहटा देवीच्या दर्शनवाऱ्या त्यांनी घडवील्या आहेत. कोणत्याही निवडणुकीचा काळ नसतांना त्यांनी देवीच्या सेवेबरोबरच असंख्य भाविकांसी प्रेमाची नाळ जोडली आहे. खा. डॉ. विखे यांनी ही यावर्षी महिलांना पंढरपूर व शिर्डी वारी घडविली आहे.

आ.लंके यांची चहाच्या टपरी पासून पानपट्टीच्या ठेल्यावरील व्यक्तीशी जवळीक आहे. प्रसंगी एखाद्या चहाच्या टपरी वर जाऊन तेथील माणसाच्या गळ्यात हात टाकून अर्धा कप चहा ते घेतात. तर भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना मलाच भूक लागलीय म्हणून त्यांना जेवायला बसवून त्यांच्या समावेत दोन घास घेतात. असे भावनिक अनुभव कथन करणाऱ्या त्यांच्या चहात्यांचा मोठा ताफा या भागात आहे. केदारेश्वरचे ॲड. प्रतापराव ढाकणे यांची महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे. ॲड. ढाकणे आपल्या महा विकास आघाडीचा व  पक्षाचाच खासदार करण्यासाठी कसून प्रयत्न करणार आहेत. हा ही लंके यांचा प्लस पॉईट आहे.

लोकसभेची निवडणूक अगोदर असल्याने पक्षातील पदाधिकारी मंडळींना तसेच त्या त्या मतदारसंघातील पक्षाचे आमदारांना आपल्या पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल. आपण लोकसभेच्या निवडणुकीत सकारात्मक काम करण्यात कुठेही कमी पडलो किंवा कुचराई झाली  असा दोषारोप आपल्यावर येऊ नये आणि आगामी विधानसभा व अन्य निवडणुकीच्या वेळी आपल्या मागे शुक्लकाष्टक लागू नये असाच प्रयत्न सर्वांना करावा लागणार आहे.

शेवगाव मतदार संघातील महा विकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच काँग्रेस पक्षाचे प्राबल्य नगण्य असल्याचे म्हणावे लागेल. येथे अखंड राष्ट्रवादीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात होत. येथील बहुतेक सहकारी संस्था राष्ट्रवादीचे माजी आमदार घुले बंधू यांचे नेतृत्वाखाली आहेत. लोकनेते स्व. मारुतराव घुले यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या वेळी, ‘कोणी कुठेही गेले तरी आपण शरद पवारांबरोबर आहोत असे ठामपणे जाहीर करून त्यांनी शरद पवारांची पाठ राखण करण्याची भूमिका घेतली होती. मात्र सध्याच्या राजकारणात घुले बंधूंनी आतापर्यंत सावध भूमिका ठेवली आहे. त्यां दोघाही बंधूनी आपली नि :संदीग्ध भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे.

अलीकडील त्यांच्या भूमिकेवरून ते अजित पवार गटाबरोबर गेल्याचे दिसते. त्यांचे कट्टर समर्थक संजय कोळगे हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना युतीचा धर्म पाळावा लागेल. ही खा. डॉ. विखे यांची आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल.