बालमटाकळी परीक्षा केंद्रात धुडघुस घालणाऱ्या तीन आरोपीना अटक

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ :  तालुक्यातील बालमटाकळीच्या भगवान विद्यालयात एसएससीची परीक्षा चालू असताना कॉपी बहाद्दराने जो धुडघुस  घातला तो अतिशय निंदनीय असून शिक्षण क्षेत्रास काळिमा फासणारा आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरातून उमटत आहेत.

यासंदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा परिक्षा केंद्र प्रमुख उत्तम रक्टे यांनी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी रात्री उशीरा फिर्याद दाखल केली असून त्यानुसार तीघाना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वर जनार्धन रक्टे रा. मुंगी, दीपक अंकुश सपकाळ व अभिषेक भगवान गरड दोघे रा. बालमटाकळी यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे कीं, भगवान विद्यालयात मंगळवारी सकाळी (दि.२६) भूगोलाचा पेपर चालू असतांना पंधरा ते सोळा इसमानी विद्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून विद्यालयात परीक्षा केंद्रात प्रवेश करून तेथील फिर्यादी व शिक्षक सुपरवायझर तसेच महिला शिक्षिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्या हातातील लाकडी काठीचा धाक दाखवून फिर्यादीसह शिक्षकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी करून तुम्हाला एकेकाला पाहून घेऊ अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

केंद्र संचालक रकटे यांचे तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात काल बुधवारी रात्री उशिरा विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपी ज्ञानेश्वर रकटे, दीपक सपकाळ व अभिषेक गरड यांना पोलिसांनी अटक केली असून नारायण शितोळे, बालमटाकळी सुरज भोंगळे व युवराज बनाये बोधेगाव, रामेश्वर जनार्दन रक्टे मुंगी, अजित नांगरे चेडे चांदगाव, कृष्णा भोंगळे बालमटाकळी, सचिन बागडे, अभिषेक भगवान गरड, दीपक अंकुश सपकाळ सर्व रा. बालमटाकळी आदि १५/१६ जणाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सपोनी महेश माळी करीत आहेत.

या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. विविध परोक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात म्हणून विविध शासकीय पातळीवर प्रयत्न होत असतांना, केंद्रप्रमुखांनी परीक्षा काळात पोलिस संरक्षणाची मागणी केली असतांना तेथील केंद्रावर पोलिस वा किमान होमगार्डची तरी नेमणूक कां केली नाही. तसेच एसएससी सारख्या परीक्षेच्या शेवटच्य पेपरच्या दिवशी परीक्षा सुरळीत चालू असल्याची खात्री करण्यासाठी किती जबाबदार पदाधिकाऱ्यांनी केंद्रास भेटी दिल्या ? हे पहाणे उचित होणार आहे.