पोलिस प्रशासनाच्या जबाबदारी झटकण्याच्या प्रकारा वरून शेवगाव शहरात बंद

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  शहरातील विकृत मनोवृत्तीच्या एका वेडसर युवकाकडून महिलांची छेड काढणे, व्यावसायिकांना, बाहेर गावाहून आलेल्या वृद्धांना त्रास देणे, चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे. अशाप्रकारचे वारंवार कृत्य करून लोकांना वेठीस धरणाऱ्या इसमावर पोलिसा कडून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तसेच पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१) शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शेवगाव न्यायालयाने त्यास येरवडा वेडयाच्या रुग्णालयात पाठविण्याचा आदेश पारित केला.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शहरातील युसुफ शेख या वेडसर युवकाने रविवारी सायंकाळी येथील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज  चौकात दोन मुलींची छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यास पोलिसाच्या ताब्यात देऊन तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यावर पोलिस निरीक्षकांनी तो वेडा आहे. तक्रार घेता येणार नाही असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. 

पोलिस प्रशासनाच्या अशा प्रकारच्या कामकाज पद्धतीच्या निषेधार्थ सोमवारी शहरबंद ठेवण्याचा निर्णय सकल शेवगावकरांनी घेतला. त्यानुसार सोमवारी पुकारण्यात आलेल्या शहर बंद आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहिल्याने ऐन नाथषष्टी उत्सवाच्या काळात ग्रामस्था बरोबरच यात्रेकरूंना विविध समस्यांचा सामना करावा लागला.

या मनोरूण युवकाने मागील महिन्यात शहरातील एका डॉक्टर वर त्यांच्या निवासस्थानी जाऊन चाकूचा वार करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली होती. त्याचवेळी शेवगाव बाजारपेठेतील व्यापारी शेवगाव शहर बंद करण्याच्या तयारीत होते. परंतु शेवगाव पोलिसांनी त्यांची समजून काढून नागरिकांना बंद पासून परावृत्त केले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आजचा प्रसंग घडला नसता.

सकल शेवगावकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून तेथून ते मोर्च्याने पोलिस ठाण्यात गेले तेथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज लांडे पाटील,  तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे, नवनाथ कवडे, यांनी आरोपिस येरवड्यास पाठविण्याची भूमिका मांडली. नागरिकाच्या तीव्र भावना लक्षात घेता पोलिसानी सदर मनोरूग्णास ताब्यात घेऊन न्यायालया पुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास येरवडा येथे पाठविण्याचा आदेश पारित केला.

पो.नि.च्या बेताल वक्तव्या बद्दल त्यांना अद्दल घडवणार : शिवसेना युवा सेना जिल्हाध्यक्ष आधाट या माथेफिरू विरुद्ध तक्रार दाखल करून त्यास येरवडयाच्या वेड्याच्या रुग्णालयात पाठवावे शेवगावचे सामाजिक स्वास्थ बिघडू नये. यासाठी ही कारवाई होणे आवश्यक असल्याची आग्रही भूमिका येथील शिवसेना शिंदे गट युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांनी घेतली असता पोनि दिगबंर भदाणे यांनी, ‘तो वेडा आहे त्याची तकार दाखल करता येणार नाही. मी तुमच्या xxx नोकर नाही, अशी भाषा वापरल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आधाट व तालुकाध्यक्ष डहाळे यांनीही’, होय आपण आमचे नोकरच लोक सेवक’ आहात. असे खडे बोल सुनावले असून जिल्हा पोलिस अधिक्षक, पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री तथा ग्रहमंत्र्याकडे समक्ष जाऊन पोनि च्या या वक्तव्या बद्दल त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.