प्रथमच १०२ टक्के महसुल झाला गोळा
कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी चालु आर्थिक वर्षात महसुली विभागाचा महसूल गोळा करण्यात नवा विक्रम केला असुन त्यांनी तब्बल १०२ टक्के महसुल गोळा करुन कोपरगावच्या महसुली विभागाचा नवा विक्रम केला आहे. या पुर्वी शंभर टक्के महसुल गोळा झाला नव्हता. अगदी गेल्या आर्थिक वर्षात केवळ ४७ टक्के महसुल झाला होता. माञ, या वर्षी महसुली विभागाने महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट मोठे देवूनही तहसीलदार भोसले यांनी संपूर्ण महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १४ कोटी १४ लाखांचे उद्दीष्ट असतानाही थेट १४ कोटी, ५१ लाख, ३५ हजारांचा महसूल गोळा करून कोपरगावच्या आजपर्यंतच्या तहसिलदामध्ये संदीप कुमार भोसले हे अव्वल ठरले आहेत.
कोपरगावच्या महसुली विभागाला सन २०२४ या आर्थिक वर्षासाठी १४ कोटी १४ लाखांचे उद्दीष्ट जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळीकर यांनी दिले होते. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार विकास गंबरे, निवासी नायब तहसीलदार, प्रफुल्लिता सातपूते, महसुली नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, वरिष्ठ लिपिक देवराम लांघी व सर्व महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अवघ्या काही महिन्यात रुजू झालेल्या तहसिलदार भोसलेंनी मागील आर्थिक वर्षाचे सर्व विक्रम मोडीत काढीत नवा विक्रम केला आहे.
जिल्ह्यातील इतर बलाढ्य तालुक्यांच्या तुलनेत कोपरगाव तालुक्याला वसुलीचे उद्दिष्ट सर्वाधिक असतानाही भोसले यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य दिशा देवुन जमीन महसूल मध्ये ४कोटी ६४ लाख रुपयांची वसुली असताना ७ कोटी १२ लाख ३४ हजार रूपयांचा महसुल जमा करुन थेट १५३ टक्के वसुली केली.
त्यात प्रामुख्याने तालुक्यातील काकडी विमान तळाचा महसुली २कोटी ३४ लाख व काकडी येथील जमिनींचा नजराणा यातुन २ कोटी २० लाख रुपये तर उर्वरित महसूल तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी शंभर टक्के शेती महसुल वसुल केला. कोपरगाव येथील नजरामधुन ८४ लाख असा सर्व मिळून ७ कोटी १२ लाख३४ हजार जमीन महसूल वसुल करण्यात आला तर गौण खनिज उत्खनन मधुन वाळू डेपोंच्या राॅयल्टी पोटी १ कोटी ६३ लाख रुपये, अवैध वाळु उपसा व इतर दंडात्मक कारवाईतून तसेच विविध विभागांच्या थकीत वसुलीतून ७० लाख रूपयांचा महसुल गोळा करीत ७ कोटी ३९ लाख १ हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला.
संपूर्ण जिल्ह्यातील महसुली तालुक्यांमध्ये तुलनेने कमी उत्पन्न असलेला तालुका असुनही महसुलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकदिलाने वसुली करीत शंभर टक्के वसुलीचा नवा विक्रम केला आहे. वसुलीचे उद्दिष्ट इतर तालुक्याच्या तुलनेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे उद्दीष्ट होते. नगर नंतर सर्वाधिक संगमनेर व कोपरगाव यांना होते. माञ, दोन्ही तालुक्यांना सर्वाधिक महसुल वसुल करीत जिल्ह्यात विक्रम केला आहे.