शेकडो हारतुरे बुके शालीचा खच हे लोकप्रियतेचे गमक – गटविकास अधिकारी कदम

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : तब्बल ३७ वर्षे निर्वेध सेवा आणि ती देखील राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनाशील असलेल्या नगर जिल्हयात व शेवगाव, राहुरी सारख्या तालुक्यात अधिक काल काम करूनही त्यांच्या निवृत्तीच्या प्रसंगी सुद्धा त्यांच्याप्रतीआदर व्यक्त करणाऱ्या विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांची उसळलेली गर्दी आणि येथे पडलेला हार तुरे शालींचा पडलेला खच पाहून रमेश शिदोरे यांच्या लोकप्रियतेचे गमक लक्षात येते. अशा शब्दात गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी उपअभियंता रमेश शिदोरे यांचे कौतुक केले.
शेवगाव पंचायत समितीचे लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता रमेश शिदोरे हे आपल्या ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या चाहत्यानी आयोजित केलेल्या शानदार सेवापूर्ती सोहळ्यात कदम बोलत होते.

यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता अनिल सानप, सीडीपी ओ भाऊसाहेब गडधे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, सौ . शारदा शिदोरे, डॉ. निलेश पाटील, अलका झाडे, गंगाधर झाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे संचालक प्रदीप काळे ,अनिल मेरड ज्ञानेश्वरचे माजी संचालक मिलिंद नाना कुलकर्णी, रामजी शिदोरे मंचावर होते.

गटविकास अधिकारी कदम यांनी शिदोरे यांच्या संस्कारामुळे त्यांची कन्या, शिवानी राजपत्रित अधिकारी झाल्याचा उल्लेख करून त्यांचा सहवास मला लाभला नाही. माझ्या वयापेक्षा अधिक सेवेचा अनुभव पाठीशी असणाऱ्या अशा ज्येष्ठांचा सहवास हवा होता. अशी खंत व्यक्त करून आम्हाला गरज पडेल अशा वेळेस त्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, कन्या शिवानी, प्रकाश जाधव, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश सांगळे, भाऊसाहेब गोरे, रामदास गाडेकर, वडूल्याचे सरपंच बाळासाहेब आव्हाड, कक्ष अधिकारी बापू चव्हाण आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिदोरे यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचा आणि मार्ग दर्शनाचा आपल्या मनोगतातून उल्लेख केला.

सत्काराला उत्तर देताना शिदोरे यांनी भावूक होऊन आपण आपल्या कार्यकाळात नोकरी म्हणजे सेवेची संधी असे समजून कामकाज केले. नोकरी करताना समाजसेवेच्या लाभाबरोबरच वेतनही मिळत असते हा दुहेरी फायदा असल्याचे नम्र पणे नमुद करून कामकाजाचा भाग म्हणून कोणास रागावलो असेल तर माफी करावी अशी विनंती केली. कल्याण मुटकुळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.