संजीवनी पॉलिटेक्निकच्या सहा अभियंत्यांची एल अँड टी डीफेन्स कंपनीत निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०५ : दरवर्षी संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या शेकडो पदविका अभियंत्यांना नामांकित नोकरी मिळते. चालु वर्षी ही  यशस्वी घौडदौड सुरू झाली असुन अलिकडेच पुण्याच्या एल अँड टी डीफेन्स कंपनीने सहा अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी आकर्षक  पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी पॉलिटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, एल अँड टी डीफेन्स ही लार्सन अँड टुब्रो या बहुराष्ट्रीय कंपनीचा भाग असुन भारतीय संरक्षण दलास संरक्षण उपकरणे आणि विविध प्रणाली पुरविणारी कंपनी आहे. संजीवनीच्या विध्यार्थ्यांना कंपनीने देश सेवेसाठी सीमेवर न जाता देश सेवेची अप्रत्यक्ष संधी दिली आहे, हे अधोरेखित होत आहे.

एल अँड टी डीफेन्स ने निवड केलेल्या पदविका अभियंत्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील गौरव धर्मराज अहिरराव, कृष्णा संतोष  चव्हाण, रोहित उमेश  गंगाद्वारे, गोल्डन सिंग, आदित्य वाल्मिक कांबळे व सुशील वाल्मिक भाटे यांचा समावेश आहे. यानंतरही अनेक कंपन्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचा निकालही लवकरच प्राप्त होईल, असे पत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या नामांकित कपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे (एसजीआय) अध्यक्ष नितिन काल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच प्राचार्य ए.आर. मिरीकर यांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डीन-अकॅडमिक प्रा. के. पी. जाधव, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार, टी अँड  पी विभागाचे प्रमुख प्रा. आय. के. सय्यद व समन्वयक प्रा. एन. एस. आहेर उपस्थित होते.

एसजीआयचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील युवक युवतींच्या हाताला चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा, या हेतुने सर्व प्रथम पॉलिटेक्निकची स्थापना केली. उद्योगांना काय ज्ञान अपेक्षित आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना अधिकचे ज्ञान द्या, असे ते नेहमी सांगायचे. त्यांच्या शिकवणीनुसार विद्यार्थ्यांना अधिकचे ज्ञान दिल्याने व टी अँड पी विभागाने मुलाखतीची सर्व तयारी करून घेतल्याने दरवर्षी शेकडो पदविका अभियंते वयाच्या१९ व्या वर्षी  स्वावलंबी बनत असुन स्व. कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरत आहे.