शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : ग्रामीण भागातल्या गोर-गरीब, दिन-दलित, शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची दारे खुली केली तर त्यातूनच खऱ्या अर्थाने एका नव्या समाजाची निर्मिती होते. पुढील पिढ्या घडवणारा शिक्षक निर्माण होतो आणि तो शिक्षणाचा वारसा पुढे वर्षानुवर्षे घेऊन जाऊ शकतो.
ज्याप्रमाणे सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात होते, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या अथक व प्रामाणिक प्रयत्नातून, मार्गदर्शनातून एक आदर्श विद्यार्थी घडत असतो. शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. यामध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान असते असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने संचलित नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित शिक्षकांच्या सेवा पूर्ती निरोप व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
संस्थेतील ज्येष्ठ शिक्षक काकासाहेब घुले, मधुकर घाडगे, अंबादास खोमणे, देवराम सरोदे, बाळासाहेब सोनवणे, शेषराव आव्हाड, भाऊसाहेब कराड व पाराजी नजन हे निवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. घुले यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.अशोक महाराज बोरुडे, ॲड.रामनाथ राठी, शब्बीर भाई शेख, त्र्यंबक जाधव, मच्छिंद्र म्हस्के, केव्हीके चे शास्त्रज्ञ श्यामसुंदर कौशिक, नारायण म्हस्के, बबन भुसारी, माजी उपसभापती अंबादास कळमकर, भाऊसाहेब कचरे, राजाभाऊ पाऊलबुद्धे, विलास लोखंडे, डॉ.अरुण पवार, प्राचार्य दादासाहेब वाबळे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी के.वाय.नजन, भारत वाबळे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, प्राचार्य डॉ.शरद कोलते, सुरेश शेरे उपस्थित होते.
प्राचार्य सुनिल शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन बाळासाहेब मंडलिक, मकरंद बारगुजे, व राजेंद्र पानगव्हाणे यांनी केले. अप्पासाहेब म्हस्के यांनी आभार मानले.