शेवगाव प्रतिनिधी, दि.0७ : लाखो भाविकांचे श्रधास्थान असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुकामाता देवस्थानात मिती चैत्र शु ॥ प्रतिपदा : मंगळवार दि.९ एप्रिल गुढी पाडव्या पासून बुधवार दि.१७ एप्रिल मिती चैत्र शु ॥ रामनवमी या कालावधीत सार्वजनिकरित्या श्री रेणुका माता वासंतिक नवरात्रोत्सव संपन्न होत आहे.
त्यानिमित्त देवस्थानचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाई सह सज्ज झाला आहे. सप्ताहभर देवस्थानात भरगच्च कार्यक्रम होत असून मंगळवारी ज्येष्ठ अर्थतज्ञ, श्रीरेणुका माता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटीचे प्रवर्तक तथा रेणुकाभक्तानुरागी प्रशांत चंद्रकांन्त भालेराव याचे हस्ते घटस्थापना करून चैत्री तथा वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.
साडेतीन शक्ती पिठापैकी एक असलेल्या माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचेच श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्रीरेणुकेचे ठाणे असल्याने माहूरला होणाऱ्या विधी प्रमाणेच सर्व विधी येथे पार पाडल्या जातात. माहूर प्रमाणे येथे ही मातेला रोज नवीन साडी चढविली जाते. रोज पुरणावरणाचा नैवेद्य व सर्व आरत्या व महाप्रसाद तसेच दर पौर्णिमा व सर्व नवरात्रोत्सव विधिवत पार पाडले जातात.
या वासंतिक नवरात्रोत्सवाच्या काळात मंगळवारी (दि.९) श्री विग्रह महाअभिषेक, महापुजा, घटस्थापना श्री सप्तशती पाठारंभ पुढे प्रत्येक माळेस श्री सप्तशती पाठ व श्रींचे कुंकुमार्चन, श्रीं चे हरिद्रार्चन, ऐलार्चन, शमी अर्चन, हिरण्यार्चन, बिल्वार्चन, श्रीसप्तशती पाठ नवचंडी यागांगभूत देवता स्थापना, मंगळवारी ( दि.१६) नवचंडी याग प्रधान होम आणि बुधवारी (दि.१७) श्रीविग्रह महापूजा, नवरात्रोत्थ सकाळी ११ ला पूर्णाहूती त्यानंतर ११.३०ला महाआरती व महाप्रसाद होणार आहे.
याव्यतिरिक्त देवस्थानात रोज सकाळी सप्तशति पाठ व साडे अकराला श्रींची महाआरती संध्याकाळी ५ ते ६ .१५ श्रींचा संगित राजोपचार साडेसहाला श्रींची महाआरती, ७ वाजता स्तुति वचन व अष्टके, त्यानंतर ८ ला छबिना मिरवणूक असे नियमित कार्यक्रम आहेत.
भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवती भक्तानुरागी मंगल चंद्रकांत भालेराव यांनी केले आहे. प्रधान आचार्य वे.शा. सं. सचिन देवा, तुषार देवा व देवस्थानाचा ब्रह्म वृंद देवस्थानातील पूजाअर्चा साठी योगदान देत आहेत.