शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा शेवगाव सह तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शेवगावात सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील क्रान्ती चौकात उभारण्यात आलेल्या भव्य मंचावर रविवारी सकाळ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. सकाळी दहाचे दरम्यान येथील पैठण रस्त्यावरील आंबेडकर भवनापासून डॉ. आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान आ. मोनिका राजळे, माजी आ. चंद्रशेखर घुले, ॲड. प्रताप ढाकणे यांनी शेवगावात तर माजी आ.नरेंद्र घुले यांनी दहिगावने येथे डॉ.आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भिम गर्जना व भिम वंदना करण्यात आली.
या वेळी विविध माध्यमिक विदयालयाच्या मुलीच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या भिम गितांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर संध्याकाळी क्रांती चौकात आकर्षक विद्युत रोशनाई व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित मिरवणुकीत विविध राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यानिमित्ताने शहराच्या विविध चौकात भव्यकमानी उभारण्यात आल्या होत्या. तर रस्त्याच्या दुतर्फा निळ्या पताका व उंच उंच झेंडे उभारण्यात आले होते. चौका चौकात लावण्यात आलेल्या भीम गीताच्या ध्वनि फितींनी वातावरणात रंगत आणली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक तरुण मंडळ, शेवगाव आगार, पंचायत समिती, नगरपरिषद आदि ठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
तसेच तालुक्यातील दहिगावने, आदर्श गाव वाघोली, आव्हाणे, बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव आदिसह गावोगावी डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.