शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : तालुक्यातील मुंगी शिवारात हिंस्र रान डुकराचा सुळसुळाट झाला आहे. या डुकराच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात काम करणे अवघड झाले आहे. शेत कामात व्यग्र असणाऱ्या वर हे प्राणी थेट हल्ला चढवत असल्याने शेतकाम करणाऱ्या कुटुंबात मोठी घबराट पसरली आहे.
शनिवारी दुपारच्या वेळी कापसाची वेचणी करणाऱ्या गोर्डे कुटूंबावर रान डुकराने केलेल्या हल्यात दोघे पति पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नगरला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी हालविण्यात आले होते. सध्या ते पैठणला खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सध्या परिसरात वीजेचां लपंडाव चालू असतो. त्यामुळे शेतकऱ्याना दिवस रात्र शेतात थांबावे लागते. तशात रानडुक्कर, बिबट्या सारख्या हिस्त्र पशुचा वावर वाढला आहे. त्यांच्या भितीने बहुधा शेतकरी पतिपत्नी एकत्र समवेत शेतात काम करत असतात. मुंगी येथील रोहिदास भानुदास गोर्डे (वय ५४) व त्यांच्या पत्नी रत्ना बाई (वय ४८) हे दोघे शनिवारी भर उन्हात दुपारी एकला ऊसाला पाणी लावून तेथेच असलेल्या कापसाची वेचणी करत होते.
तेवढ्यात कपासीच्या झुडपातील रानडुकराने रत्ना बाईवर झडप घालून त्यांच्या हातापायाला चावे घेतले. त्या जीवाच्या आकांताने ओरडल्या तेव्हा रोहिदास धावले त्यांनी रानडुकराच्या डोळ्यावर लगावलेल्या ठोस्याने डुकराने जखमी रत्ना बाईला सोडले पण जातांना रोहिदास यांनाही जखमी केले आहे. जवळच्या शेतातील लोकांनी त्या उभयतांना नगरला सिव्हिल रुग्णालयात पाठविले.
मुंगीच्या सरपंच ललिता राजेंद्र ढमढेरे यांनी यासंदर्भात पीडित गोर्डे कुटूंबास वनखात्याने अर्थ सहाय्य करावे तसेच या हिंस्त्र पशुचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.